IPL 2023 Points Table : एका पराभवाने RCBला आपटले! नेट रनरेट + मधून मायनसमध्ये अन् तिसऱ्या क्रमांकावरून थेट...

IPL 2023 Points Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला काल लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. RCBच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली अन् त्याचा मोठा फटका विराट कोहलीच्या RCB ला गुणतालिकेत बसला आहे....

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला काल लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. डेव्हिड विलीने सुरुवातीला धक्के देत कोलकाता नाइट रायडर्सला ( KKR) ५ बाद ८९ अशी कोंडी केली होती, परंतु शार्दूल ठाकूरने त्यांची धुलाई केली. त्यानंतर RCBच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली अन् त्याचा मोठा फटका विराट कोहलीच्या RCB ला गुणतालिकेत बसला आहे....

इडन गार्डनवर 'पठाण' शाहरूख खानच्या उपस्थितीत KKR ने दमदार खेळ करून दाखवला. त्यांच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी हार मानली, परंतु 'लॉर्ड' शार्दूल त्यांच्यासाठी धावून आला. शार्दूलने २९ चेंडूंत ९ चौकार व ३ उत्तुंग षटकार खेचून ६८ धावा चोपल्या आणि त्याला रिंकू सिंगची ( ४६) खणखणीत साथ मिळाली. रहमनुल्लाह गुरबाझने ५७ धावा केल्या. KKR ने ५ बाद ८९ वरून ७ बाद २०४ धावांपर्यंत आश्चर्यकारकरित्या झेप घेतली.

विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिसने ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यात डरकाळी फोडली होती, ती पाहून इडन गार्डनवर धमाका होईल असे वाटले होते. पण, कोहली व फॅफ हे दोन्ही बार फुसके निघाले. सुनील नरीनने अप्रतिम चेंडूवर विराटचा (२१) त्रिफळा उडवला. वरुण चक्रवर्थीनेही फॅफची ( २३) दांडी गुल केली. त्यानंतर RCB चा डाव गडगडला तो गडगडलाच.

वरुण चक्रवर्थीने १५ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर सुनील नरीनने १६ धावांत २ महत्त्वाचे मोहरे टिपले. एकही लिस्ट ए, प्रथम श्रेणी सामना न खेळलेल्या सुयश शर्माने ३० धावांत ३ धक्के दिले. RCBचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत १२३ धावांत तंबूत परतला अन् KKR ने ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर डरकाळी फोडणारे वाघ घराबाहेर शेळी ठरले आणि याचा मोठा फटका गुणतालिकेत त्यांना बसला. या सामन्यापूर्वी RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर होता आणि त्यांचा नेट रनरेट + १.९८१ असा होता. सामन्याचा निकाल आला अन् RCB -१.२५६ अशा नेट रन रेटसह थेट सातव्या क्रमांकावर गेले. तेच KKR सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी आले.