गरीबीतून वर आला अन् आता IPL ची सर्व कमाई गरीब मुलांसाठी खर्च करणार; रिंकू सिंगचा निर्णय

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आतापर्यंत गरीब कुटूंबातील अनेक खेळाडू मैदान गाजवत आहेत. लहानपणापासून करावा लागलेल्या संघर्षाची जाण प्रत्येकाने ठेवली आहे. पण, जो संघर्ष आपल्या वाट्याला आता तो इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी प्रयत्न करणारे फार कमी आहेत. KKRचा युवा फलंदाज रिंकू सिंग ( Rinku Singh) याचे नाव या खेळाडूंमध्ये आता दाखल झाले आहे.

२००८ पासून आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी या व्यासपीठाचा वापर करून आपला ठसा उमटवला आहे आणि कोट्यवधी झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंग गुजरात टायटन्सविरुद्ध ५ चेंडूत ५ षटकार मारून आश्चर्यकारक कामगिरी केली होती. आता संपूर्ण जग त्याला ओळखू लागले आहे.

रिंकू सिंगला २०१६ मध्ये रणजीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. यानंतर पुढच्या वर्षी किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या संघात घेतले. त्यानंतर कोलकाताने रिंकूला २०१८ साली ८० लाख रुपयांना घेतले. तेव्हापासून रिंकू सतत खेळत आहे आणि २०२३ मध्ये ५५ लाखांत पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले.

KKR ने ५५ लाखांच्या किमतीत रिंकूला करारबद्ध केले आहे आणि तो ही रक्कम गरीब क्रिकेटपटूंसाठी खर्च करणार आहे. गरिबीमुळे कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न भंगू नये, अशी रिंकूची इच्छा आहे. रिंकू यूपीच्या अलीगढमध्ये एक मोठे वसतिगृह बांधत आहे.

रिंकू एका गरीब कुटुंबातून आला आहे जिथे त्याचे वडील सिलेंडर पोहोचवायचे. त्याचा भाऊ ऑटो रिक्षाचालक असून त्याने कोचिंगमध्ये झाडू मारण्याचे कामही केले आहे. मात्र या परिस्थितीतही रिंकूने हार मानली नाही आणि क्रिकेट खेळत राहिले.

५० लाख रुपयांचे वसतिगृह बांधून गरीब मुलांना मदत करण्याचे रिंकूचे स्वप्न आहे. रिंकू सिंहचा मोठा भाऊ मुकुल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वसतिगृहात जवळपास १०० विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गरिबीमुळे मागे राहिलेल्या मुलांना या वसतिगृहात राहण्यासोबतच क्रिकेटचे प्रशिक्षणही मिळेल, हा रिंकू सिंगचा उद्देश आहे.

रिंकू सिंगच्या प्रशिक्षकांनी न्यू इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, त्याना नेहमीच युवा खेळाडूंसाठी वसतिगृह बांधायचे होते. आर्थिक संकटातून जात असलेल्या खेळाडूंना मदत करायची होती. पण आता त्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. रिंकूचे बालपणीचे प्रशिक्षक मसूद उझ जफर अमिनी हे १२-१३ वर्षांपासून रिंकूला प्रशिक्षण देत आहेत.

प्रशिक्षक म्हणाले की, रिंकूने तीन महिन्यांपूर्वी नवीन वसतिगृहाचा पाया घातला होता. वसतिगृहात एकूण १४ खोल्या असतील. या खेळाडूंना मोफत भोजन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा स्थितीत संपूर्ण वसतिगृहाचा खर्च ५० लाखांच्या जवळपास आहे. आयपीएलनंतर रिंकूच त्याचे उद्घाटन करणार आहे.