IPL 2022: आयपीएलमध्ये विराट कोहलीची बॅट चालेना, तरीही नोंदवतोय विक्रमावर विक्रम, इतर कुणी आसपासही नाही

IPL 2022: विराट कोहलीला यंदाच्या हंगामात अपेक्षित कामगिरी करता आली नसली तरी त्याच्या नावावर एकापाठोपाठ एक विक्रमांची नोंद होत आहे

आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला ७ विकेट्सनी हरवले. चार सामन्यांमधील बंगळुरूचा तिसरा विजय आहे. या सामन्यात विराटने ४८ धावांची खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवत गुणतालिकेत मोठी झेप घेतली. बंगळुरूचा संघ आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

विराट कोहलीने या सामन्यात ३६ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार ठोकले. तसेच अनुज रावतसोबत ८० धावांची खेळी करून बंगळुरूचा विजय निश्चित केला.

त्याबरोबरच विराट कोहलीने आयपीएलमध्ये ५५० चौकारही पूर्ण केले. टी-२० लीगमध्ये ५५० चौकार आणि २०० हून अधिक चौकार ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे. विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५५४ चौकार आणि २१२ षटकार ठोकले आहेत. तसेच ५ शतके आणि ४२ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.

मात्र यंदाच्या हंगामात विराट कोहलीला चार सामन्यात एकही अर्धशतक फटकावता आलेले नाही. पंजाब किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद ४१ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर केकेआरविरुद्ध १२ आणि राजस्थानविरुद्ध त्याला केवळ ५ धावाच जमवता आल्या होत्या.

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जमवणारा फलंदाज आहे. त्याने ३७ च्या सरासरीने ६३८९ धावा फटकावल्या आहेत. यात तो ३२ वेळा नाबाद राहिला असून, त्याचा स्ट्राईक रेट १३० एवढा आहे. अन्य कुण्या फलंदाजाला सहा हजार धावाही जमवता आलेल्या नाहीत.

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने २०१६ मध्ये ८१ च्या सरासरीने ९७३ धावा कुटल्या होत्या. त्यात ४ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश होता. पण विराटचा संघ पराभूत झाला होता.