New Rule, Formats in IPL 2022 : दोन नवीन संघ, नवीन फॉरमॅट, नवे नियम अन् बरंच काही; आयपीएलमधील हे बदल जाणून घेणे आहे महत्त्वाचे

New Rule, Formats in IPL 2022 : अवघ्या चार दिवसानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरूवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बरोबर सायंकाळी ७.३० वाजता सलामीच्या सामन्याला सुरूवात होईल. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये बरंच काही नवं पाहायला मिळणार आहे....

यंदाच्या आयपीएलमध्ये ८ नव्हे तर १० संघांमध्ये चषकासाठी स्पर्धा रंगणार आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ आयपीएल २०२२मध्ये दाखल झाले आहेत. लोकेश राहुलच्या खांद्यावर लखनौचे, तर हार्दिक पांड्याकडे गुजरात संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लखनौ व गुजरात हे दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे आयपीएलच्या फॉरमॅटमध्येही बदल करण्यात आला आहे. दहा संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.

ग्रुप अ मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि ग्रुप ब मध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स हे संघ असणार आहेत.

मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ व चेन्नई यांच्याशी दोनवेळा भिडणार, तर हैदराबाद, बंगळुरू, पंजाब व गुजरात यांच्याविरुद्ध एकच सामना खेळणार.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ हैदराबाद, बंगळुरू, पंजाब, गुजरात व मुंबई यांच्याशी प्रत्येकी दोन, तर कोलकाता, राजस्थान, दिल्ली व लखनौ यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब, गुजरात व राजस्थान यांच्याशी प्रत्येकी दोन, तर मुंबई, कोलकाता, दिल्ली व लखनौ यांच्यासोबत प्रत्येकी १ सामना खेळणार.

कोलकाता नाइट रायडर्सचा संघ मुंबई, राजस्थान, दिल्ली, लखनौ व हैदराबाद यांच्याशी प्रत्येकी दोन, तर चेन्नई, बंगळुरु, पंजाब व गुजरात यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार.

विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोडली आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये तो RCBचा कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणून मैदानावर उतरणार आहे. २०११ पासून विराटकडे ही जबाबदारी होती. यंदाच्या पर्वात फॅफ ड्यू प्लेसिसकडे RCB चे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मेगा ऑक्शनमध्ये RCBने चेन्नई सुपर किंग्सच्या या प्रमुख खेळाडूला ७ कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. फॅफने आयपीएलमध्ये एकूण १०० सामन्यांत २९३५ धावा केल्या आहेत आणि त्यात २२ अर्धशतकांचा समावेश आहे.

पहिला गुन्हा : सात दिवसांचे क्वारंटाईन किंवा आयपीएल २०२२ मध्ये आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलसाठी अमलात येणाऱ्या कालावधीसाठी बाहेर; दुसरा गुन्हा : विनावेतन एका सामन्याचे निलंबन. सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खेळविण्याबाबत विचार होऊ शकेल; तिसरा गुन्हा : उर्वरित पर्वासाठी संघातून हकालपट्टी.

एखाद्या फ्रॅन्चायजीकडे १२ पेक्षा कमी खेळाडू उपलब्ध असतील आणि सामन्यासाठी मैदानावर संघ उतरविण्यास असमर्थ असतील तर प्लेईंग इलेव्हनमध्ये किमान सात भारतीय खेळाडू असायला हवेत. याशिवाय एक बदली क्षेत्ररक्षकही असायला हवा. बीसीसीआय विशेष अधिकारांतर्गत सत्रातील सामन्यांचे पुन्हा आयोजन करण्याचा प्रयत्न करेल. असे न झाल्यास हा मुद्दा आयपीएलच्या तांत्रिक समितीकडे पाठविला जाईल. आयपीएल तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम असेल.

पहिल्या गुन्ह्यासाठी खेळाडूच्या कुटुंबातील महिलेलादेखील सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास उर्वरित पर्वासाठी संघ किंवा त्या खेळाडूच्या कुटुंबीयांना बायो-बबलमधून काढून टाकले जाईल.

टाय झाल्यानंतर काय? - १. प्लेऑफ किंवा अंतिम सामना ‘टाय’ झाल्यानंतर, सुपर ओव्हर किंवा त्यानंतर सुपर ओव्हरने कोणताही निर्णय न झाल्यास लीग टप्प्यातील खेळ पाहिला जाईल. जो संघ लीग टप्प्यात अव्वल असेल तो विजेता मानला जाईल. याचाच अर्थ आता सर्व संघांसमोर हे आव्हान असेल की, प्लेऑफमध्ये पात्र ठरण्याबरोबरच त्या संघाला साखळीतही अव्वल स्थान मिळवावे लागेल.

२. जर संघ प्लेइंग इलेव्हन तयार करू शकला नाही तर, तो सामना नंतर पुन्हा शेड्यूल केला जाईल. त्यानंतरही सामना झाला नाही तर, हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल.

३. दुसरा सर्वात महत्त्वाचा बदल डीआरएसबाबत आहे. नव्या नियमानुसार प्रत्येक डावातील डीआरएसची संख्या एक वरून दोन करण्यात आली आहे.

४. फलंदाजासाठी स्ट्राईट रोटेशन - एखादा फलंदाज झेल बाद होत असताना क्रिझच्या मध्यभागी असला तरीही नवीन फलंदाजाने स्ट्राइकवर यावे. याशिवाय चेंडूवर थुंकीचा वापर करता येणार नाही. वाईड बॉलसंबंधी नियम देखील बदलण्यात आला आहे.

५. माकंडिंग - आता आयपीएलमध्ये मांकडिंग हे धावबाद मानले जाईल. नॉन स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज चेंडू पडण्याआधीच क्रिझ सोडत असेल तर, गोलंदाज त्याला बाद करू शकतो. एमसीसीने अलीकडे या नियमाला मान्यता दिली होती. याआधी मांकडिंग हे अवैध मानले जायचे.