KL Rahul, IPL 2022 : लखनौनं लोकेश राहुलला मालामाल केलं, आयपीएलमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू बनवलं; रोहित, विराट, जडेजा, पंतला मागे टाकलं!

KL Rahul etches his name in history books : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2022) १५व्या पर्वात लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझींकडून कोणते तीन प्रमुख खेळाडू खेळणार, याबाबतचा सस्पेंस संपला आहे.

लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुलसह ( KL Rahul) ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस व फिरकीपटू रवी बिश्नोई यांना करारबद्ध केले आहे, तर अहमबादबादनं हार्दिक पांड्या ( Hardik Pandya), राशिद खान आणि शुबमन गिल यांना ताफ्यात दाखल करून घेतले. पण, यामध्ये लोकेश राहुलला लखनौनं मालामाल करताना आयपीएल इतिहासात सर्वात महागडा खेळाडू बनवलं.

२०१८पासून राहुलची आयपीएलमधील कामगिरी दमदार झालेली आहे. मागील दोन पर्वात तो पंजाब किंग्सकडून खेळला. २०१३मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने, त्यानंतर २०१४ व २०१६ मध्ये अनुक्रमे सनरायझर्स हैदराबाद व बंगळुरूकडून तो खेळला.

२०१८मध्ये पंजाब किंग्सनं त्याला ११ कोटींत ताफ्यात घेतले होते. त्यानं ५५ सामन्यांत ५६.६२च्या सरासरीनं २५४८ धावा केल्या आहेत. त्यात २५ अर्धशतकं व दोन शतकांचा समावेश आहे. त्यानं २०१८ ते २०२१ या तीन पर्वात अनुक्रमे ६५९, ५९३ आणि ६२६ धावा केल्या.

लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुलसाठी १७ कोटी रुपये मोजले. यंदाच्या पर्वातील लोकेश हा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. शिवाय आयपीएल इतिहासात सर्वात महागडा खेळाडू विराट कोहली ( Virat Kohli) याच्याशीही त्यानं बरोबरी केली आहे.

IPL 2022 मध्ये लोकेश राहुल १७ कोटी घेऊन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि रिषभ पंत हे प्रत्येकी १६ कोटींसह अव्वल स्थानी होते. विराट कोहलीनं २०१८ ते २०२१ या कालावधीत RCBकडून १७ कोटी मानधन घेतले होते, परंतु यंदा RCBनं त्याला १५ कोटींत रिटेन केलं.

लोकेश राहुल २०१८ ते २०२१ या पर्वात ११ कोटी पगार घेऊन पंजाब किंग्सकडून खेळला. आता लखनौनं त्याला ६ कोटींची वाढ दिली आहे. RP Sanjiv Goenka Group ने लखनौ फ्रँचायझीची मालकी हक्क मिळवले. २९ वर्षीय लोकेश राहुल हा त्यांना त्यांच्या ताफ्यात हवाच होता.

लखनौ ही मार्कस स्टॉयनिसची आयपीएलमधील चौथी फ्रँचायझी असणार आहे. २०१५मध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आताची दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. २०२०मध्ये दिल्लीनं ४.८ कोटींत मार्कसला पुन्हा ताफ्यात घेतले. त्यानं कॅपिटल्ससाठी २७ सामन्यांत ४४१ धावा केल्या आहेत आणि १५ विकेट्सही घेतल्या. या मधल्या कालावधीत तो पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडूनही खेळला. लखनौनं त्याच्यासाठी ९.२ कोटी रुपये मोजले.

रवी बिश्नोईनं २०२०चा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप गाजवला. त्यानं त्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. पंजाब किंग्सनं त्याला २ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. त्यानं पहिल्या पर्वात १४ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर २०२१मध्ये ९ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या. लखनौनं त्याला ४ कोटी दिले आहेत.

लखनौ फ्रँचायझीनं कोचिंग स्टाफमध्ये अँडी फ्लॉवर, गौतम गंभीर आणि विजय दहिया यांचा समावेश केला आहे. फ्लॉवर हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, गंभीर हा मेंटॉर असेल, तर दहिया साहाय्यक प्रशिक्षक असेल. गंभीर हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार होता आणि त्यानं दोन आयपीएल जेतेपदं पटकावली आहेत. दहिया हेही KKRच्या साहाय्यक स्टाफमध्ये होते.

अहमदाबाद फ्रँचायझीनं हार्दिक व राशिद यांच्यासाठी प्रत्येकी १५ कोटी मोजले, तर शुबमनला ८ कोटी दिले.