IPL Auction 2022: हे 10 गोलंदाज गाजवणार IPL 2023चा लिलाव; सगळ्या फ्रँचायझींचे असणार लक्ष!

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलचा 2023च्या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोची येथे मिनी लिलाव पार पडणार आहे.

विद्वथ कवेरप्पा हा कर्नाटक क्रिकेट वर्तुळातील एक प्रभावी वेगवान गोलंदाज आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये आपल्या शानदार गोलंदाजी प्रदर्शनासह आठ सामन्यांत 18 बळी पटकावले. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये कर्नाटकच्या या वेगवान गोलंदाजाने शानदार गोलंदाजी करून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये नऊ बळी घेतले आहेत. त्यामुळे आयपीएल फ्रँचायझी त्याला खरेदी करण्यासाठी बोली लावू शकतात.

चिंतन गजा हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. 28 वर्षीय चिंतनने 34 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 22.68 च्या सरासरीने 122 बळी घेतले आहेत. गुजरातच्या वेगवान गोलंदाजाने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये कहर केला आणि 4.31 च्या सरासरीने केवळ सात सामन्यांमध्ये 15 बळी पटकावले. नव्या चेंडूने बळी पटकावण्यासाठी गजा माहिर आहे, त्यामुळे आयपीएल फ्रँचायझी त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात.

चामा मिलिंद सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेट वर्तुळातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. या 28 वर्षीय खेळाडूने 45 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 5.34 च्या सरासरीने 82 बळी घेतले आहेत. ट्वेंटी-20 फॉरमॅटबद्दल भाष्य करायचे झाले तर त्याने 59 सामन्यांमध्ये 7.75 च्या सरासरीनुसार गोलंदाजी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2022 च्या मेगा लिलावात या गोलंदाजाची निवड केली होती.

आयर्लंडच्या संघाचा गोलंदाज जोशुआ लिटलने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत: सिद्ध केले आहे. त्याने 2022 या वर्षात 26 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत आणि 7.58 च्या सरासरीनुसार 39 बळी घेतले आहेत. डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजीसाठी लिटलला ओळखले जाते.

दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी याने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने 204 सामन्यांमध्ये 7.23 च्या सरासरीने गोलंदाजी करून 237 बळी घेतले आहेत.

श्रीलंकेचा दुष्मंथा चमीरा हा 140 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने 42 वनडे सामने खेळले आहेत आणि 5.41 च्या सरासरीने 4 बळी घेतले आहेत. ट्वेंटी-20 मध्ये 30 वर्षीय खेळाडूने 8.08 च्या सरासरीनुसार आतापर्यंत 52 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झाम्पाला मर्यादित षटकाच्या क्रिकेटमधील संघाचा प्रमुख चेहरा मानले जाते. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कांगारूच्या संघाला विजय मिळवून दिला आहे. 30 वर्षीय झाम्पाने 72 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये 6.93च्या सरासरीने 82 बळी पटकावले आहेत. झाम्पा मॅचविनर खेळाडू असल्यामुळे आयपीएलच्या फ्रँचायझी त्याच्यावर बोली लावण्याची शक्यता आहे.

ख्रिस वोक्स हा सर्व फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 33 वर्षीय वोक्सने 108 सामने खेळले आहेत आणि 5.45 च्या सरासरीने 157 बळी घेतले आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 26 सामन्यांमध्ये 27 बळी पटकावले आहेत.

ख्रिस जॉर्डन हा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील इंग्लिश संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. 34 वर्षीय जॉर्डनने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 295 सामने खेळले आहेत आणि 8.57 च्या सरासरीने 310 बळी घेतले आहेत. अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजांना शांत ठेवण्यासाठी जॉर्डन ओळखला जातो.

केन रिचर्डसनने जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून समोर आला आहे. त्याने 154 ट्वेंटी-20 सामने खेळले असून 8.05 च्या सरासरीनुसार 200 बळी घेतले.