IPL 2021, SRH vs RR Match Highlights : सनरायझर्स हैदराबादच्या प्ले ऑफच्या आशा अजूनही कायम; जाणून घ्या RRचं नेमकं कुठे चुकलं

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Match Highlights : सनरायझर्स हैदराबादचा आजचा विजय हा वरच्यावर निरर्थक वाटत असला तरी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवणार आहे.

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Match Highlights : सनरायझर्स हैदराबादचा आजचा विजय हा वरच्यावर निरर्थक वाटत असला तरी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवणार आहे. संजू सॅमसनच्या ८२ धावांच्या प्रत्युत्तरात SRHचा संघ एकजुटीनं खेळला अन् जेसन रॉय व केन विलियम्सनच्या एकजुटीनं विजय मिळवला. या विजयानंतर आता SRHलाही प्ले ऑफचे स्वप्न पडू लागले आहे आणि त्यांनी उर्वरित चारही सामने जिंकल्यास त्यांचे हे स्वप्न पूर्णही होऊ शकते.

डेव्हिड वॉर्नरचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही आजच्या सामन्यातील सर्वात चर्चेची गोष्ट ठरली. वॉर्नर फॉर्माशी झगडतोय, परंतु त्याला बाकावर बसवलं जाईल याची कल्पनाही कुणी केली नसावी. त्याच्या जागी SRHकडून आज जेसन रॉयनं पदार्पण केलं.

प्रथम फलंदाजीला आलेल्या RRचा एव्हिन लुईस दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. भुवनेश्वर कुमारनं त्याची विकेट घेतली. त्यानंतर यशस्वी जैस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांनी संयमी खेळ करत विकेट टिकवली. राजस्थाननं ७ षटकांत १ बाद ५७ धावा केल्या. जैस्वालनं २३ चेंडूंत ३६ धावा केल्या. लिएम लिव्हिंगस्टोन ( ४) हा पुन्हा अपयशी ठरला.

संजू सॅमसनचं फॉर्मात येणं अनेकांच्या मनात धडकी भरवणारं आहे. विशेषतः ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ज्यांनी टीम इंडियात निवड झालीय, परंतु ते फॉर्माशी झगडत आहेत, त्यांच्यासाठी ही बाब चिंता वाढवणारी आहे. संजू सॅमसननं सलग दुसऱ्या सामन्यात त्यानं अर्धशतकी खेळी केली आणि आज तर त्यानं सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

सॅमसन ५७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. राजस्थाननं ५ बाद १६४ धावा केल्या. लोम्रोर २९ धावा केल्या. अखेरच्या तीन षटकांत RRला केवळ १८ धावाच करता आल्या आणि ही बाब त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली, तर आश्चर्य वाटायला नको.

वॉर्नरच्या जागी संधी मिळालेल्या जेसन रॉयनं पहिल्याच सामन्यात त्याचा दबदबा दाखवून दिला. त्यानं अप्रतिम फटकेबाजी करताना अर्धशतक झळकावून RRच्या हातून सामना खेचून आणला. वृद्धीमान सहानंही पहिल्या विकेटसाठी त्याला उत्तम साथ दिली होती.

चेतन सकारीयानं जेसन रॉयची विकेट घेतली, परंतु तोपर्यंत सामना जवळपास RRच्या हातून निसटला होता. चेंडू व धावा यांच्यात काहीच फरक उरला नव्हता आणि केन विलियम्सन खेळपट्टीवर असल्यानं SRHही निर्धास्त होता. त्याला अभिषेक शर्माचीही साथ मिळाली.

शर्मानं १६ चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या, तर केननं ४१ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या. हैदराबादनं ९ चेंडू व ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. RRला अखेरच्या तीन षटकांत केवळ १८ धावाच करता आल्या आणि हिच संथ कामगिरी त्यांना महागात पडली.

IPL 2021च्या गुणतालिकेवर लक्ष टाकल्यास चेन्नई सुपर किंग्स ( १६ गुण), दिल्ली कॅपिटल्स ( १६) हे संघ सेफ झोनमध्ये आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( १२) तिसऱ्या क्रमांकावर आहे, तरीही त्यांना उर्वरित चार पैकी दोन सामने जिंकावे लागतील. चेन्नई व दिल्ली यांना प्ले ऑफ स्थान पक्के करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे. तेच आता राजस्थान, कोलकाता, पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांना चारपैकी किमान तीन सामने जिंकावे लागतील. या संघांनी १० सामन्यांअंती ८ गुण पटकावले आहेत.