India vs England : मालिका जिंकायचीय तर विराट कोहलीला शांत ठेवलेलंच बरं, इंग्लंडच्या कर्णधाराला सतावतेय चिंता

India vs England : इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला एक चिंता सतावतेय... भलेही इंग्लंडनं तिसरी कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली असली तरी रूटला कोणताही धोका पत्करायचा नाही.

चौथ्या कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रूटनं मालिका जिंकायचीय तर विराट कोहलीला शांत ठेवलेलं बरं, असं विधान करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लंड दौऱ्यावर विराटला अजूनही मोठी खेळी साकारता आलेली नाही. पण, तो कधी फॉर्मात येईल याचाही अंदाज व्यक्त करता येत नाही. ( Joe Root wary of Virat Kohli factor)

''आमच्या गोलंदाजांना श्रेय द्यायला हवं. विराट कोहली हा जागतिक दर्जाचा फलंदाज आहे आणि त्याला मोठी खेळी करू न देणं, हे आमच्या गोलंदाजांचं यश आहे. आम्ही त्याला शांत ठेवण्यात यश मिळवलं आहे आणि गोलंदाजांनी ही जबाबदारी योग्यरितीनं पार पाडली, तर आम्ही मालिका जिंकू शकतो. त्याला बाद करण्याची रणनीती आम्हाला सापडली आहे. तो चांगला खेळाडू आहे आणि कसोटी क्रिकेटही त्यानं गाजवलं आहे,''असे मत रूटनं व्यक्त केलं.

तो पुढे म्हणाला,''विराट कोहली एका अव्वल दर्जाच्या टीमचे नेतृत्व करत आहे आणि त्यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर मिळेल, याची मला खात्री आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला भोळा समजून भ्रमात राहणे परवडणारे नाही. आता आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. सामन्यात कुठेही आघाडी घेण्याची किंचितशी संधी दिसत असले, तर ती सोडायला नको.''

तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडिया २ बाद २१५ अशा सुस्थितीत होते, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांचा डाव २७८ धावांवर गुंडाळला. इंग्लंडनं हा सामना एक डाव व ७६ धावांनी जिंकला.

''ती दर्जेदार कामगिरी होती. पण, आता त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीचं आव्हान आमच्यासमोर आहे. गोलंदाजीत आमची बाजू उजवीच आहे आणि अनेक काळापासून त्यात आम्ही वर्चस्व गाजवलं आहे. फलंदाजीतही हेडिंग्लेमध्ये मालिकेतील सर्वोत्तम कामगिरी झालीय, चौथ्या कसोटीत त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे,''असेही रूट म्हणाला.

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ - जो रूट, मोइन अली, जेम्स अँडरसन, जॉनथन बेअरस्टो, सॅम बिलिंग, रोरी बर्न्स, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, डेवीड मलान, क्रेग ओव्हर्टन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वूड