यशस्वी जैस्वाल 'Retires hurt', पण इंग्लंडला केले 'हर्ट'; गावस्कर, रोहितचा विक्रम मोडला

India vs England 3rd Test Live Updates Day 3 - यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवली आहे. दुसऱ्या कसोटीत द्विशतकानंतर यशस्वीने आज राजकोट येथे शतकी खेळी करून इंग्लंडच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले आहे. त्याने शुबमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी १५०+ धावांची भागीदारी करताना भारताला तीनशेपार धावांची आघाडी मिळवून दिली आहे. सेलिब्रेशन करताना पाठीत उसण भरल्याने रिटायर्ट हर्ट होऊन यशस्वीला १०४ धावांवर माघारी जावे लागले.

आर अश्विनला कौटुंबिक कारणामुळे अचानक तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली, त्यामुळे भारतीय संघाला एका गोलंदाजाची उणीव जाणवेल असे वाटले होते. पण मोहम्मद सिराजने ४, कुलदीप यादवने २ व रवींद्र जडेजाने २ विकेट्स घेत इंग्लंडला गुंडाळले. भारताच्या पहिल्या डावातील ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर गडगडला.

बेन डकेटने १५१ चंडूंत २३ चौकार व २ षटकारांसह १५३ धावा केल्या. कुलदीप यादवने त्याची विकेट मिळवून दिली. त्यानंतर बेन स्टोक्स ( ४१) ला रवींद्रने माघारी पाठवून इंग्लंडला संकटात टाकले. पाहता पाहता इंग्लंडचा कालच्या २ बाद २०७ धावांवरून आज ३१९ धावांवर गडगडला. इंग्लंडने ९५ धावांत ८ विकेट्स गमावल्या.

जो रुटने दुसऱ्या डावात रोहितला ( १९) पायचीत केले. पण, शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल ही जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून उभी राहिली. यशस्वीने जेम्स अँडरसनच्या एका षटकात ६,४,४ असे फटके खेचले. यशस्वी व गिल यांनी १२२ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. यशस्वीने १२२ चेंडूंत शतक पूर्ण केले. मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक ठरले. त्याच्या या शतकात ९ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता.

२३ वर्षांखालील भारतीय फलंदाजाने एकाच कसोटी मालिकेत २ किंवा अधिक शतक झळकावणारा यशस्वी ७ वा फलंदाज ठरला. सुनील गावस्कर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ४ शतक झळकावली होती, तर मोहम्मद अझरुद्दीनने १९८४-८५ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३ शतकं केली होती. दिलीप वेंगसरकर ( वि. वेस्ट इंडिज, १९७८), रवी शास्त्री ( वि. इंग्लंड, १९८४) , सचिन तेंडुलकर ( वि. ऑस्ट्रेलिया, १९९१) व विनोद कांबळी ( वि. श्रीलंका, १९९३) यांनी प्रत्येकी २ शतकं झळकावली होती.

२३ वर्ष पूर्ण करण्यापूर्वी कसोटीत सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये यशस्वीने ( ३) मोहम्मद अझरुद्दीनशी बरोबरी केली. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( ८), रवी शास्त्री ( ५), सुनील गावस्कर ( ४) व विनोद कांबळी ( ४) हे आघाडीवर आहेत.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतात सर्वाधिक २ शतक करणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या पंक्तित यशस्वी जाऊन बसला आहे, परंतु त्याने केवळ ६ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करून सर्वांना मागे टाकले. मुरली विजय ( ७ इनिंग्ज), पंकज रॉय ( ८), बुधी कुदेरान ( १०), रोहित शर्मा ( १३), मोतगानहाली जैसिम्हा ( १३) व सुनील गावस्कर ( ३८) यांना त्याने मागे टाकले.