India vs England, 1st Test : जो रूटचा भन्नाट फॉर्म, टीम इंडियाची धुलाई करताना ९३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याची फटकेबाजी दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहे आणि त्याला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याचीही दमदार साथ मिळत आहे. रूटनं १५० धावांचा पल्ला पार केला, तर स्टोक्सनंही अर्धशतक झळकावून भारतासमोर मोठे आव्हान ठेवण्याच्या दिशेनं खेळ सुरू केला आहे.

Lunch Break : जो रूट व बेन स्टोक्स यांची फटकेबाजी, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले, ३ बाद ३५५ धावा

भारतीय गोलंदाज ही जोडी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, परंतु क्षेत्ररक्षकांकडून त्यांना साजेशी साथ मिळताना दिसत नाही. त्यात विराट कोहली ( Virat Kohli) आणि DRS यांच्यातील ३६ चा आकडा याही सामन्यात दिसला. अवघ्या १५ मिनिटांत विराटनं दोन DRS गमावले, तर स्टोक्सचे दोन झेलही सुटले.

खेळपट्टीवर जम बसलेल्या रूटनं पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी थोडा आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या दिवशी त्यानं डॉम सिब्लीसह दोनशे धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या धावसंख्येचा मजबूत पाया घातला होता. त्यावर स्टोक्स धावांचे इमले रचत आहे.

आर अश्विन, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा यांना दुसऱ्या दिवशीही विकेटसाठी संघर्ष करावा लागला. दुसऱ्या दिवसाच्या १०८व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर स्टोक्स पायचीत असल्याची अपील झाली. विराटनं लगेच DRS घेतला, परंतु रिप्लेमध्ये चेंडू पॅडऐवजी स्टोक्सच्या ग्लोजला लागल्याचे दिसले आणि भारतानं हा रिव्ह्यू गमावला.

पुढच्याच षटकात नदीमच्या गोलंदाजीवर रुटसाठी पायचीतची अपील झाली. नदीमनं सुरेख चेंडू फेकला होता, परंतु तो पॅडच्या वरच्या बाजूला लागला. तरीही विराटनं DRS घेतला आणि चेंडू यष्टींवरून जात असल्याचे रिप्लेत दिसले. हाही DRS भारताला गमवावा लागला.

आर अश्विनच्या गोलंदाजीवर स्टोक्सचा रिटर्न कॅच सुटला. स्टोक्सनं पुढे येऊन ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ती रिटर्न कॅच येईल असे अश्विनलाही वाटले नव्हते आणि त्याच्याहातून झेल सुटला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराकडून स्टोक्सचा झेल सुटला.

कर्णधार म्हणून भारतात कसोटी सामन्यात १५०+ धावा करणारा जो रूट हा सातवा परदेशी कर्णधार ठरला आहे. यापूर्वी क्लाईव्ह लॉईड ( १९७४, १९७५ व १९८३), ए कालिचरण ( १९७८), इंझमाम उल-हक ( २००५), अॅलेस्टर कुक ( दोनवेळा २०१२), स्टीव्ही स्मिथ ( २०१७), दीनेश चंडीमल ( २०१७) यांनी अशी खेळी केली आहे.

सलग तीन कसोटी सामन्यांत १५०+ धावा करणारा जो रूट हा सातवा खेळाडू ठरला. रुटनं आशिया खंडात सलग तीन सामन्यांत १५०+ धावा केल्या आहेत. यापूर्वी वॉल्टर हॅमोंड ( Walter Hammond 1928/29), डॉन ब्रॅडमन ( Don Bradman 1937), झहीर अब्बास ( Zaheer Abbas 1982/83), मुदस्सर नाझर ( Mudassar Nazar 1983), टॉम लॅथम ( Tom Latham 2018/19) यांनी हा पराक्रम केला आहे. कुमार संगकारानं २००७ मध्ये सलग चार सामन्यांत १५०+ धावा केल्या होत्या.