१९८३, २०११ मध्ये 'इतकं' मिळालं होतं टीम इंडियाला बक्षीस; २०२३ मध्ये छप्परफाड कमाई

१९८३ मध्ये जेव्हा कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा क्रिकेट चाहत्या लता मंगेशकर यांना संघातील खेळाडूंना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यासाठी 'संगीत कार्यक्रम' करावा लागला होता.

२०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमवरही पैसांचा पाऊस पडला होता. तर यंदा २०२३ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनणाऱ्या टीमला आयसीसीकडून ३३ कोटींहून अधिक रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे.

या फायनलमध्ये जो उपविजेता ठरेल ती टीमही मालामाल होईल. विजेत्याच्या रक्कमेपेक्षा निम्मी रक्कम बक्षीस म्हणून उपविजेता संघाला दिली जाईल. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या टीमला त्यावेळी दैनिक भत्ता म्हणून प्रति मॅच ५० पाऊंड दिले जायचे.

१९८३ च्या संघात विकेटकीपर असलेले सय्यद किरमाणी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'आम्हाला दररोज ५० पौंड भत्ता मिळत असे. ही रक्कम आम्ही आमच्या दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, कपडे धुण्यासाठी वापरली. आम्हाला संपूर्ण टूरसाठी १५ हजार रुपये बोनस म्हणून मिळाले. ट्रॉफी जिंकून भारतात परतल्यावर ही रक्कम देण्यात आली.

२८ वर्षांनंतर जेव्हा एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०११ मध्ये विश्वचषक जिंकला. त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला होता. विश्वचषक संघात समाविष्ट असलेल्या सर्व भारतीय खेळाडूंना प्रत्येकी २ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. याशिवाय विविध राज्य सरकारांनीही खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला होता. अनेक कंपन्यांनी खेळाडूंना विविध पुरस्कारही दिले होते.

२०११ मध्ये विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम ८ मिलियन यूएस डॉलर (६६ कोटी) निश्चित करण्यात आली होती. त्याचवेळी ICC ने टीम इंडियाला सुमारे २५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली होती. तर उपविजेत्या श्रीलंकेला १२.५ कोटी रुपये मिळाले होते.

वर्ल्डकप चॅम्पियन संघाला ICC कडून ३३.१७ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळेल. तर उपविजेत्याला यापैकी निम्मी रक्कम मिळेल. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना समान रक्कम ६.६३ कोटी रुपये मिळाले. याशिवाय, जर त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये सामना जिंकला त्यांना ३३.१७ लाख रुपये दिलेत. अंदाजे ८२.९५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम ICC द्वारे विश्वचषक २०२३ मध्ये वितरित होत आहे.

१९८३ मध्ये जेव्हा भारतीय संघ विश्वविजेता बनला तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) खेळाडूंना मानधन देण्यासाठी पैसे नव्हते. आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयची अवस्था त्यावेळी खूपच वाईट होती. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांना खेळाडूंना पुरस्कार देण्याची इच्छा होती, मात्र पैशांअभावी ते हतबल झाले होते.

बीसीसीआयनं स्वरकोकिळा लता मंगेशकर यांना मदत मागितली. भारतीय टीमच्या विजयासाठी दिल्लीत संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यातून २० लाख कमाई झाली. त्यानंतर भारतीय टीममधील प्रत्येकाला बक्षीस म्हणून १-१ लाख देण्यात आले.

बीसीसीआय आणि त्यावेळच्या खेळाडूंनी लता मंगेशकर यांचे योगदान कायम आठवणीत ठेवले. बीसीसीआयनं लता मंगेशकर जिवंत असेपर्यंत भारताच्या प्रत्येक स्टेडिअमवर मॅच पाहण्यासाठी त्यांच्यासाठी १ जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता.