India vs Australia, 3rd T20I : बरोबर एक वर्षानंतर टीम इंडिया हरली; जाणून घ्या ८ डिसेंबरचा योगायोग

ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाच्या बाजूनं झुकलेला सामना फिरवला. हार्दिक पांड्या व विराट कोहली यांना मोक्याच्या क्षणी माघारी पाठवून ऑस्ट्रेलियानं तिसरा सामना जिंकला. भारतानं ही मालिका २-१ अशा फरकानं जिंकली. विराटला तीन जीवदान मिळाले आणि त्याचा त्यानं पुरेपूर फायदा उचलला. त्याला हार्दिक पांड्याची साथ मिळाली आणि ही जोडी विजय निश्चित करतील असे वाटत होते, परंतु अॅडम झम्पानं सामना फिरवला.

आजच्या सामन्यात अॅरोन फिंचचे पुनरागमन झाले, परंतु वॉशिंग्टन सुंदरनं त्याला भोपळाही फोडू न देता दुसऱ्या षटकात माघारी जाण्यास भाग पाडले. मॅथ्यू वेड व स्टीव्हन स्मिथ यांनी संयमी खेळ करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाला १ बाद ५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांची ६५ धावांची भागीदारी सुंदरनं तोडली.

१०व्या षटकात स्मिथ २४ धावांवर माघारी परतला. पहिल्या दहा षटकांत सुंदरनं ४ षटके फेकली आणि ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. वेड व ग्लेन मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी केली. मॅक्सवेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करणारा वेड ८० धावांवर माघारी परतला.

२०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टी नटराजननं मॅस्कवेलचा त्रिफळा उडवला. मॅक्सवेलनं ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात अॅरोन फिंचनं पहिले षटक मॅक्सवेलला टाकायला दिले अन् त्यानं पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला ( ०) बाद केले. तिसऱ्या षटकात मॅस्कवेलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीही माघारी परतला असता, परंतु स्टिव्हन स्मिथनं त्याचा सोपा झेल सोडला.

पाचव्या षटकात अँड्य्रू टायनं स्वतःच्याच गोलंदाजीवर विराटचा रिटर्न कॅच सोडला. त्यानंतर विराट व शिखर धवन या जोडीनं ऑसी गोलंदाजांची धुलाई केली. विराट फुल फॉर्मात दिसत होता. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं एवढंच त्याच्या डोक्यात सुरू होते.

विराट-शिखर जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. ९व्या षटकात मिचेल स्वेप्सनच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा शिखरनं केलेला प्रयत्न फसला. डॅनीएल सॅम्सनं डिप मिडविकेटला अफलातून झेल टिपला.

विराटनं ट्वेंटी-20 क्रिकेटमधील २५ वे अर्धशतक पूर्ण करताना रोहित शर्माच्या सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, दुसरीकडे स्वेप्सननं एकाच षटकात टीम इंडियाला दोन धक्के दिले. संजू सॅमसन ( १०) आणि श्रेयस अय्यर ( ०) झटपट माघारी परतले. स्वेप्सननं २३ धावांत ३ विकेट घेतल्या.

विराट आणि हार्दिक पांड्या यांनी टीम इंडियाचा विजय पक्का करतील असे वाटत होते, परंतु १८व्या षटकात अॅडम झम्पानं पांड्याला ( २०) माघारी पाठवले. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वेडनं यष्टिंमागे विराटला जीवदान दिलं. पण, अँड्य्रू टायनं पुढील षटकात पहिल्या चेंडूवर विराटला बाद केले. विराट ६१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार खेचून ८५ धावांवर माघारी परतला. भारताला ७ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले.

२०१६मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला ३-० असे पराभूत केले होते. त्याचीच पुनरावृत्ती आज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली झाली असती, परंतु टीम इंडियाला अपयश आलं.

विराट कोहली अँड टीमची ट्वेंटी-20 सामन्यातील अपराजित मालिका आज खंडित झाली. ८ डिसेंबर २०१९ मध्ये टीम इंडियाला वेस्ट इंडिजकडून हार मानावी लागली होती. त्यानंतर टीम इंडियानं सलग १० ट्वेंटी-20 सामने जिंकले आणि बरोबर वर्षपूर्तीला टीम इंडियाला हार मानावी लागली