India vs Australia, 2nd Test : रिषभ पंतनं केल्या २९ धावा अन् व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यासह तीन दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) कॅप्टन्स इनिंग खेळताना टीम इंडियाला आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतानं ६६ षटकांत ५ बाद १९८ धावा केल्या आहेत.

वृद्धीमान साहाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिषभ पंतला ( Rishabh Pant) मोठी खेळी करण्याची संधी होती. त्यानं आक्रमक खेळ करून तसा विश्वास दाखवला, पण मिचेल स्टार्कनं त्याला बाद केले. पण, त्याच्या २९ धावांच्या खेळीनही मोठा विक्रम नोंदवला.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियावर जबाबदारी आहे ती मोठी आघाडी घेण्याची. पहिल्या दिवशी मयांक अग्रवाल भोपळा न फोडता माघारी परतला, परंतु पदार्पणवीर शुबमन गिल ( Shubhaman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी टीम इंडियाला सावरले.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी ऑसींनी DRS घेतला, परंतु तो अपयशी ठरला. २२व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑसींना दिवसाचे पहिले यश मिळाले. ६५ चेंडूंत ८ चौकारांसह ४५ धावा करणारा गिल कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुजारा १७ धावांवर बाद झाला.

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. दोघांनी संयमी खेळी करताना ५२ धावांची भागीदारी केली. नॅथन लियॉननं त्यांची एकाग्रता भंग केली अन् जोरदार फटका मारण्याच्या नादात विहारी ( २१) झेलबाद झाला.

संघात पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतनं आक्रमक खेळावर भर दिला. त्यानं ऑसींचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स यालाच लक्ष्य केले. पंतच्या आक्रमक खेळीमुळे ऑसींना त्यांचे डावपेच बदलावे लागले.

पंतनं पाचव्या विकेटसाठी अजिंक्यसह ७३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. मिचेल स्टार्कनं पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. २९ धावांवर तो माघारी परतला. रहाणे एका बाजूनं खिंड लढवत आहे आणि त्यानं अर्धशतक पूर्ण केलं.

रिषभ पंतनं ऑस्ट्रेलियात सलग आठ डावांमध्ये २५+ धावा केल्या ( २५, २८, ३६, ३०, ३९, ३३, १५९*, २९). वॅली हॅमोंड, रुसी सुर्ती व व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यानंतर ऑस्ट्रेलियात सलग आट डावांमध्ये २५+ धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला.