Ind vs Aus 3rd test live : खेळपट्टी, फलंदाजी अन् बरंच काही! पराभव होताच रोहित शर्माने तक्रारींचा पाढाच वाचला

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी अडीच दिवसांत जिंकली.

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी अडीच दिवसांत जिंकली. ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटीत जबरदस्त कमबॅक करताना ९ विकेट्सने बाजी मारली आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-२ अशी पिछाडी कमी केली. भारताचे ७६ धावांचे लक्ष्य ऑसींनी सहज पार केले. या पराभवानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेलं विधान महत्त्वाचं आहे.

भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. रवींद्र जडेजा ( ४-७८), आर अश्विन ( ३-४४) आणि उमेश यादव ( ३-१२) यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात काही खास झाली नाही. शुभमन गिल ( ५), रोहित शर्मा (१२), विराट कोहली ( १३), रवींद्र जडेजा ( ७) हे अपयशी ठरले. चेतेश्वर पुजाराने ५९ धावांची खेळी करून खिंड लढवली. भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर गडगडला. नॅथन लाएनने २३.३-१-६४-८ अशी गोलंदाजी केली.

आर अश्विनने नव्या चेंडू चांगलाच वळवला अन् दुसऱ्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केले. पण, मार्नस लाबुशेन व ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक फटकेबाजी केली आणि पटापट धावा केल्या. हेड व लाबुशेन ८८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना वन डे स्टाईल धावा जोडल्या. हेड पदलालित्य दाखवताना अश्विनला पुढे येऊन जोरदार फटके मारत होता. त्याने ५३ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या. लाबुशेनने नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने १८.३ षटकांत १ बाद ७८ धावा करून सामना जिंकला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.

रोहित शर्मा म्हणाला,''तुम्ही जेव्हा कसोटी सामना गमवता, तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा झालेल्या नसतात. सुरुवात करायची झालीच तर.. पहिल्या डावात आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. पहिल्या डावात फलकावर धावा चढवणे किती महत्त्वाचे असते, हे आम्हाला समजले. त्यांनी ८०-९० धावांची आघाडी घेतली, तेव्हा मोठ्या खेळीची आम्हाला गरज होती, परंतु त्यातही आम्ही अपयशी ठरलो. फक्त ७५ धावांची आघाडी घेऊ शकलो. ''

''एक संघ म्हणून सुधारणा करणे गरजेचे आहे, हे समजून घ्यायला हवं. अशा आव्हानात्मक खेळपट्टीवर जेव्हा खेळतो, तेव्हा चांगली गोलंदाजीही करणे गरजेचे आहे. आम्ही त्यांच्या गोलंदाजांना एकाच स्पॉटवर गोलंदाजी करण्याची संधी दिली. त्यांच्या गोलंदाजीचे श्रेय मला हिरावून घ्यायचे नाही. नॅथन लाएन अप्रतिम खेळला. भारतातील खेळपट्टीवर लोकं अधिक चर्चा का करतात? नॅथनने कशी गोलंदाजी केली, पुजारा आणि ख्वाजाने किती चांगला खेळ केला, याबाबत का मला विचारत नाही? आम्हाला प्रयत्न करायला हवेत आणि धाडसाने खेळायला हवं. काही खेळाडूंकडून आम्हाला अपेक्षा होती, परंतु ते खरे उतरले नाहीत,''असेही रोहित म्हणाला.