६९ चेंडूंत १२१* धावा! रोहित शर्माचं वादळ घोंगावलं; २ वर्ल्ड रेकॉर्डसह पाडला ८ विक्रमांचा पाऊस

India vs Afghanistan T20I Live - रोहित शर्माने ( Rohit Sharma) कॅप्टन्स इनिंग्स करताना आज अनेक विक्रम मोडले आणि वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केले. रिंकू सिंग ( Rinku Singh) यानेही वादळी खेळी करताना भारताला मोठी धावसंख्या उभी करून दिली.

यशस्वी जैस्वाल ( ४) व विराट कोहली ( ०), शिवम दुबे ( १) आणि संजू सॅमसन ( ०) अपयशी ठर्लयाने भारताची अवस्था ४ बाद २२ अशी झाली होती. पण, रोहित शर्मा व रिंकू सिंग ही जोडी मैदानावर शड्डू ठोकून उभी राहिली.

रोहितने ६९ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या, तर रिंकूनेही ३९ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६९ धावांची वादळी खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १९० धावांची भागीदारी करताना संघाला ४ बाद २१२ धावांपर्यंत पोहोचवले.

भारतीय कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०त सर्वाधिक १५७० धावांचा विराटचा विक्रम आज रोहितने मोडला. शिवाय त्याने कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०त १३ वेळा फिफ्टी प्लस धावा करून विराटशी बरोबरी केली. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ८७ षटकारांचा विक्रमही नावावर केला. इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनचा ( ८६) विक्रम त्याने मोडला.

रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पाचवे शतक झळकावले आणि सूर्यकुमार यादव ( ४) व ग्लेन मॅक्सवेल ( ४) यांना मागे टाकले. रिंकूनेही षटकाराने अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे कर्णधार म्हणून हे ट्वेंटी-२०ती तिसरे शतक ठऱले आणि त्याने बाबर आजमशी बरोबरी केली.

रोहित व रिंकू यांनी ९५ चेंडूंत १९० धावांची भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून विराट कोहली व हार्दिक पांड्या यांचा ( ११३ धावा वि. पाकिस्तान, २०२२) विक्रम मोडला.

रोहितची आजची नाबाद १२१ धावांची खेळी ही ट्वेंटी-२०तील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठऱली. त्याने २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ४३ चेंडूंत ११८ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर नाबाद १११ ( ६१ चेंडू) वि. वेस्ट इंडिज, २०१८, १०६ ( ६६ चेंडू) वि. दक्षिण आफ्रिका, २०१५ व नाबाद १०० वि. इंग्लंड, २०१८ या खेळींचा क्रमांक येतो.

भारताकडून कोणत्याही विकेटसाठी ट्वेंटी-२०त सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आज रिंकू व रोहित ( १९०*) यांच्या नावावर नोंदवला गेला. दीपक हुडा व संजू सॅमसन यांचा १७६ धावांचा विक्रम मोडला गेला. रोहितने २०१७ मध्ये लोकेश राहुलसह १६५ धावा जोडल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सलामीवीर म्हणून सर्वाधिक १६२ षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्डही आज रोहितने नावावर केला. त्याने मार्टिन गुप्तील ( १६१) याचा विक्रम मोडला.