भारत-अफगाणिस्तान सामना ६ कारणांमुळे ठरला ट्वेंटी-२० मधील सर्वात ऐतिहासिक

IND vs AFG 3rd T20I : भारताने दोन सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून मालिका ३-० ने जिंकली. हा सामना सहा कारणांमुळे ट्वेंटी-२०तील सर्वात ऐतिहासिक सामना ठरला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ विकेट्सच्या मोबदल्यात २१२ धावा केल्या. २१३ धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ ६ बाद २१२ धावा करू शकला. यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघाने एका विकेटवर १६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात भारतीय संघालाही केवळ १६ धावा करता आल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित आणि रिंकूने फलंदाजी करत २ बाद ११ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने पहिल्या तीन चेंडूंमध्ये दोन विकेट गमावल्या आणि यासह भारताने सामना जिंकला.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना ठरला ज्यामध्ये दोन सुपर ओव्हर खेळल्या गेल्या. दोन सुपर ओव्हरचा हा दुसरा ट्वेंटी-२० सामना आहे. २०२०च्या सुरुवातीला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन इलेव्हन यांच्यातला सामना दोन सुपर ओव्हर मध्ये खेळला गेला होता.

बंगळुरूमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानने मिळून एकूण ४२४ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये बरोबरी करण्यात आलेला हा दुसरा सर्वाधिक धावांचा सामना ठरला. २०१० मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण ४२८ धावा झाल्या होत्या आणि तो सामना टाय झाला होता.

बंगळुरूकडून रोहित शर्माने ६९ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात सर्वाधिक पाच शतके करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सूर्यकुमार यादव ( ४) व ग्लेन मॅक्सवेल ( ४) यांना मागे टाकले.

भारताने डावाच्या शेवटच्या दोन षटकांत ५८ धावा जोडल्या. पुरुषांच्या ट्वेंटी-२० मधील १९व्या आणि २०व्या षटकात कोणत्याही संघाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

भारताने शेवटच्या ५ षटकांत १०३ धावा केल्या. भारताव्यतिरिक्त पुरुषांच्या ट्वेंटी-२०क्रिकेटमध्ये नेपाळ हा एकमेव संघ आहे ज्यांनी १६ ते २० षटकांमध्ये १००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. नेपाळने २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध शेवटच्या पाच षटकांत १०८ धावा केल्या होत्या.

रोहित शर्मा ट्वेंटी-२० मध्ये शतक झळकावणारा कसोटी खेळणाऱ्या देशातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. रोहितने शतक झळकावले तेव्हा त्याचे वय ३६ वर्षे २६२ दिवस होते. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. गेलने २०१६ मध्ये ३६ वर्षे ११७ दिवसांचा असताना इंग्लंडविरुद्ध नाबाद शतक झळकावले होते.