किंग कोहलीला 'विराट' विक्रमाची संधी! तेंडुलकर, गावसकरांच्या 'या' पराकमाशी होणार बरोबरी

विराट कोहली WTC Final मध्ये फ्लॉप ठरला असला तरी त्याला विंडिज दौऱ्यावर मोठा धमाका करण्याची संधी आहे

Virat Kohli Records, IND vs WI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला. पहिल्या डावात कोहलीने केवळ 14 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याला चांगली सुरूवात मिळूनही तो मोठी खेळी करू शकला नाही. 49 धावांवर तो बाद झाला.

आता भारताला वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. टीम इंडिया दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्रथम कॅरेबियन संघाशी भिडणार आहे. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल आणि मग टी२० मालिका रंगेल.

कोहलीला WTC फायनलमधील खराब कामगिरी विसरून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करण्याची संधी आहे. इतकेच नव्हे तर एका खास बाबतीत, विराटला सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांसारख्या दिग्गजांच्या पंगतीत सामील होण्याचीही सुवर्णसंधी आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी विराट कोहलीला मिळणार आहे.

विराटने आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांमध्ये 43 च्या सरासरीने 822 धावा केल्या. म्हणजेच चार डावात 188 धावा करण्यात कोहली यशस्वी ठरला तर तो हा पराक्रम करू शकेल.

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध गावसकर यांनी 27 सामन्यांच्या 48 डावांमध्ये एकूण 2,749 धावा केल्या. गावसकरांच्या पाठोपाठ द्रविड (1978) दुसऱ्या, व्हीव्हीएस लक्ष्मण (1715) तिसऱ्या आणि सचिन तेंडुलकर (1,630) चौथ्या स्थानी आहे.