Guwahati T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका तर भिडणारच, पण विराट आणि रोहितमध्येही होणार 'फाइट'

रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधारही आहे. त्याच्याच नेतृत्वात भारताने टी20 मालिकेत नुकताच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.

भारतीय संघ आता गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील दुसरा टी-20 सामना खेळणार आहे. येथील बारासपारा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन देश तर भिडणारच, पण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या समोरही एक विक्रम असणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधारही आहे. त्याच्याच नेतृत्वात भारताने टी20 मालिकेत नुकताच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.

विराट होऊ शकतो 11 हजारी - विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात या फॉरमॅटमध्ये ओव्हरऑल 11 हजार धावा करणारा फलंदाज होऊ शकतो. त्याने टी20 क्रिकेटमध्ये जवळपास 40 च्या सरासरीने 353 सामन्यांत एकूण 10981 धावा कुटल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावे एकूण सहा शतके आणि 81 अर्धशतके आहेत. तो 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यापासून केवळ 19 धावाच दूर आहे.

विराट आणि रोहितमध्ये फाइट - विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात टी-20 इंटरनॅशनल सामन्यांतील धावांच्या बाबतीत फार फरक नाही. या दोन्ही फलंदाजांच्या धावांमध्ये केवळ 31 धावांचाच फरक आहे. मात्र, सरासरीच्या बाबतीत विराट रोहितच्या तुलनेत बराच पुढे आहे. विराटची सरासरही 50 पेक्षा अधिक आहे. तर रोहितची सरासरी 32 च्या जवळपास आहे. विराटने 2010 मध्ये तर रोहितने 2007 मध्येच टी-20 इंटरनॅशनलमध्ये डेब्यू केले होते.

नंबर-2 वर आहे विराट - T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा त्याच्या पुढे आहे. विराटने आतापर्यंत भारतासाठी 108 टी-20 सामन्यांमध्ये एकूण 3663 धावा केल्या आहेत. नुकतेच त्याने आशिया कपमध्ये या फॉरमॅटमधील आपले पहिले शतक झळकावले आहे.

टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा - T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये भारतासाठी आतापर्यंत 140 सामने खेळले असून एकूण 3694 धावा ठोकल्या आहेत. यात 4 शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितची आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 32.12 च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत.

सध्या रोहित शर्मा टीम इंडियाचे नतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वातच भारत आगामी T20 विश्वचषकात मैदानात उतरेल. टीम इंडियाने नुकतेच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही भारताचे लक्ष्य तसेच असेल.

ख्रिस गेल टॉपर - टी-20 सामन्यांत ओव्हरऑल सर्वाधिक धावांच्या बाबतीत वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल टॉपर आहे. गेलने जगातील अनेक टी-20 लीगमध्ये भाग घेतला आहे. त्याने T-20 सामन्यांत आतापर्यंत एकूण 14562 धावा केल्या आहेत.

टी-20 सामन्यांत ओव्हरऑल सर्वाधिक धावांच्या बाबतीत वेस्ट इंडीजचाच धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 11915 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक (11902 धावा) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट कोहली सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.