IND vs ENG: टीम इंडियाच्या स्टार्सनं ओव्हलवर रेकॉर्ड नोंदवण्याची संधी; विराट, रोहित व जसप्रीत मोडणार मोठे विक्रम!

इंग्लंडनं तिसरी कसोटी जिंकून भारताविरुद्धची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. इंग्लंडनं चौथ्या कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघात तीन तगड्या खेळाडूंचा समावेश केला, तर टीम इंडियानंही राखीव गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचा संघात समावेश करून घेतला आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली याला मालिकेत काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्याच्या बॅटीतून एकच अर्धशतक आले आहे. पण, त्याला ओव्हल कसोटीत मोठा पराक्रम करता येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला चौथ्या कसोटीत फक्त १ धाव काढावी लागणार आहे. २००८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीनं कसोटीत ७६७१, वन डेत १२, १६९ व ट्वेंटी-२०त ३१५९ धावा केल्या आहेत.

रोहित शर्मानं या मालिकेत चांगली कागमिरी केली आहे आणि म्हणूनच आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्यानं पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा करण्यासाठी चौथ्या कसोटीत २२ धावा कराव्या लागतील. या मालिकेत रोहितनं ४६च्या सरासरीनं २३० धावा केल्या आहेत.

भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं चौथ्या कसोटीत तीन विकेट्स घेताच कसोटीत तो बळींचे शतक पूर्ण करेल. त्यानं या मालिकेत १४ विकेट्स घेतल्या आहेत.

ओव्हलवर कसोटी शतक झळकावणारा रिषभ पंत हा तिसरा आणि पहिला भारतीय यष्टिरक्षक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ओव्हलवर शतक झळकावणारा तो पहिलाच परदेशी यष्टिरक्षक आहे. त्यानं २०१८च्या दौऱ्यात ११४ धावांची खेळी केली होती. त्याच्याव्यतिरिक्त १९३५मध्ये लेस अमेस व १९६६ला जॉन मरे यांनी शतक झळकावले होते.

ओव्हलचं मैदान भारतीय फलंदाजांसाठी काही खास राहिलेलं नाही. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे इथे अपयशी ठरले आहेत. त्यांच्यापैकी एकालाही येथे अर्धशतक झळकावता आलेले नाही. कोहलीनं येथे १८.८च्या सरासरीनं ७५, पुजारानं १३च्या सरासरीनं ५२ आणि रहाणेनं १०.३च्या सरासरीनं ४१ धावा केल्या आहेत.