'मुंबईकर' यशस्वी जैस्वालकडे मोठी संधी! ९४ वर्षे जुन्या डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाशी बरोबरी करणार?

'असे' केल्यास यशस्वी हा जगातील दुसरा फलंदाज ठरेल!

Yashasvi Jaiswal records Don Bradman, IND vs ENG 5th Test: यशस्वी जैस्वाल हा भारताचा उदयोन्मुख प्रतिभावान सलामीवीर आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत जेम्स अँडरसनसारख्या अनुभवी गोलंदाजासह इतर सर्वच गोलंदाजांची त्याने धुलाई केली आहे.

यशस्वी जैस्वालने इंग्लंड-भारत कसोटी मालिकेत ६००हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीनंतर, जैस्वाल हा दुसरा भारतीय फलंदाज आहे, ज्याने कसोटी मालिकेत ६०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

मालिकेत भारताच्या अनेक खेळाडूंनी आपली चमक दाखवली आहे. त्यात महत्त्वाची म्हणजे यशस्वी जैस्वालने प्रत्येक सामन्यात आपला ठसा उमटवत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे.

यशस्वी जैस्वालने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विक्रमी खेळी केली. पहिल्या कसोटीत जयस्वाल शतकापासून २० धावा दूर राहिला. पण दुसऱ्या कसोटीत त्याने शानदार द्विशतक (२०९) झळकावले. तसेच, तिसऱ्या कसोटीतही त्याने २१४ धावांची खेळी केली.

यशस्वी जैस्वालने या कसोटी मालिकेत दोन द्विशतके ठोकली आहेत. त्याला मालिकेत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांचा ९४ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

१९३०मध्ये अँशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी ३ द्विशतके झळकावली होती. त्यानंतर एकाही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. जैस्वालकडे मात्र या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. पाचव्या कसोटीत त्याने द्विशतक ठोकले तर हा पराक्रम करणारा तो जगातला दुसरा फलंदाज ठरेल.