IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजला डिवचायला गेले अन् इंग्लंडचे फॅन्स स्वतःच्याच तोंडावर आपटले, पाहा नेमके काय घडले

ind vs eng 3rd test live updates cricket match score : तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा संघ उजवा ठरला.

ind vs eng 3rd test live updates cricket match score : तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा संघ उजवा ठरला. भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर हसीब हमीद व रोरी बर्न्स यांनी १२० धावांची भागिदारी करताना संघाला दिवसअखेर ४२ धावांची आघाडी मिळवून दिली आहे.

३९ वर्षीय जेम्स अँडरसननं पहिल्या स्पेलमध्ये ८ षटकांत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेत जबरदस्त धक्का दिला. त्यातून टीम इंडिया सावरलीच नाही आणि संपूर्ण संघ ७८ धावांत तंबूत परतला. रोहित शर्मानं सर्वाधिक १९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनीही जबरदस्त खेळ केलाय.

हेडिंग्ले कसोटीतील पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. रोहित शर्मा ( १९), लोकेश राहुल ( ०), चेतेश्वर पुजारा ( १), विराट कोहली ( ७), अजिंक्य रहाणे ( १८), रिषभ पंत ( २), रवींद्र जडेजा ( ४), मोहम्मद शमी ( ०), जसप्रीत बुमराह ( ०) व मोहम्मद सिराज ( ३) अशी टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी तीन, ऑली रॉबिन्सन व सॅम कुरन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

कसोटीत विराट कोहली व रोहित ही जोडी प्रथमच सोबत खेळताना दिसली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. विराट ( ७) अँडरसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. अँडरसनच्या तडाख्यानंतर ऑली रॉबिन्ससन २ धक्के दिले.

रोहित व अजिंक्य यांनी ९२ चेंडूंत केलेली ३५ धावांची भागीदारी ही टीम इंडियासाठी सर्वोत्तम ठरली.१०५ चेंडू खेळून १९ धावा करणाऱ्या रोहितची महत्त्वाची विकेट ओव्हर्टननं घेतली. पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीही माघारी परतला. सॅम कुरननं पुढच्याच षटकात सलग दोन धक्के दिले. भारताचे तळाचे पाच फलंदाज अवघ्या ११ धावांवर माघारी परतले.

इंग्लंडनं आजच्या कसोटीत सलामीला हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी उतरवली अन् त्या दोघांनी संयमी खेळ करताना इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. हमीद आणि बर्न्स दोघांनीही अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर बिनबाद १२० धावा करत ४२ धावांची आघाडी घेतली आहे. हमीद ६०, तर बर्न्स ५२ धावांवर नाबाद आहेत.

दरम्यान या सामन्यात इंग्लंडच्या फॅन्सकडून भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न झाला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजच्या दिशेनं काही फॅन्सनी गुलाबी चेंडू फेकला. कर्णधार विराट कोहलीनं त्यावर नाराजी व्यक्त करत पंचांकडे तक्रार केली.

त्यानंतरही इंग्लंडच्या फॅन्सकडून सिराजला डिवचण्याचे काम सुरूच होते अन् भारतीय गोलंदाजांनी चोख प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली. इंग्लंजचे फॅन्स सिराजला स्कोअर अर्थात धावा किती झाल्या विचारत होते. त्यावर सिराजनं मालिकेत आम्ही १-० असे आघाडीवर आहोत, असे उत्तर देत त्या हुल्लडबाज प्रेक्षकांना तोंडावर पाडले.( Crowd asking Siraj what is the score and he replied something like "1-0" in the series.)