भारताची उडाली 'झोप'! १९८५ पासून जे इंग्लडच्या फलंदाजाला जमले नव्हते, ते ऑली पोपने केले!

India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard : पहिल्या डावात १९० धावांच्या पिछाडीनंतर इंग्लंडचा संघ जबरदस्त पुनरागमन करेल असे कुणालाही वाटले नव्हते. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा निम्मा संघ १६३ धावांवर माघारी पाठवला होता आणि आता शेपूटच गुंडाळायचे होते. पण, ऑली पोप ( Ollie Pope) मैदानावर उभा राहिला.

अक्षर पटेल व लोकेश राहुल यांनी पोपचा झेल सोडून भारताच्या अडचणीत वाढ केली. २०१३ नंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात प्रथमच भारतात ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडचा दुसरा डाव ४२० धावांवर गुंडाळला गेला आणि भारतासमोर २३१ धावांचे तगडे लक्ष्य उभे राहिले. पोप पोप २७८ चेंडूंत २१ चौकारांसह १९६ धावांवर बाद झाला.

ऑली पोप हा भारतात कसोटीत १५० धावा करणारा तिसरा युवा इंग्लिश फलंदाज ठरला. १९५१ मध्ये टॉम ग्रॅव्हेनी यांनी २४ वर्ष व १८१ दिवसांचे असताना हा विक्रम केला होता. त्यानंतर १९८४ मध्ये टिम रॉबिन्सनने ( २६ वर्ष व २१ दिवस) आणि १९९३ मध्ये ग्रॅमी हिकने ( २६ वर्ष व २७२ दिवस) यांनी हा पराक्रम केलेला. पोप २६ वर्ष व २३ दिवसांचा आहे आणि त्याने या विक्रमात हिकला मागे टाकले.

२०१७ नंतर भारतात तिसऱ्या डावात शतक झळकावणारा ऑली पोप हा पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. २०१७मध्ये पुण्यात स्टीव्ह स्मिथने १०९ धावांची खेळी केली होती.

ऑली पोपने १५०+ धावा करून आणखी एक विक्रम नावावर केला. एलिस्टर कूकनंतर ( १७६ धावा, अहमदाबाद, २०१२) या टप्पा ओलांडणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. पोपने दुसऱ्या डावात इंग्लंडकडून सर्वाधिक १७९*धावांचा विक्रम नावावर नोंदवताना कूकला मागे टाकले.

भारतात तिसऱ्या क्रमांकावर १५०+धावा करणारा ऑली पोप हा २०१७नंतर ( स्टीव्ह स्मिथ नाबाद १७८, रांची) पहिला परदेशी फलंदाज ठरला.

भारतात कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर १५०+ धावा करणारा ऑली पोप हा पाचवा इंग्लिश फलंदाज ठरला. यापूर्वी १९८५ मध्ये माईक गॅटींगने चेन्नईत २०७ धावा केल्या होत्या. त्याआधी १९६१ मध्ये केन बॅरिंग्टनने ( १७२ धावा, कानपूर आणि १५१* धावा, ब्रेबॉर्न) आणि १९५१ मध्ये टॉमी ग्रॅव्हेनी ( १७५ धावा, ब्रेबॉर्न) यांनी हा पराक्रम केलेला.