Video : मोहम्मद सिराजनं रागात धरला कुलदीप यादवचा गळा; BCCIकडे कारवाईची मागणी

India vs England, 1st Test : चेन्नई कसोटीत जो रूट ( Joe Root) हे एकच नाव चर्चेत आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून आलेली टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडवर वर्चस्व गाजवतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

भारतात येण्यापूर्वी आशियाई खेळपट्टीचा श्रीलंकेत जाऊन चांगलाच अभ्यास केलेल्या जो रूटनं ( Joe Root) गोलंदाजांना चांगलेच सतावलं. १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या रूटनं चेन्नईवर २१८ धावांची खेळी करताना विश्वविक्रम नोंदवला. बेन स्टोक्सनंही ( Ben Stokes) तुफान फटकेबाजी करून ८२ धावा कुटल्या. इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी ८ बाद ५५५ धावा केल्या.

या सामन्यात टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये भांडण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) यानं फिरकीपटू कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) याचा गळा पकडताना दिसत आहे.

या व्हिडीओत सिराज प्रचंड रागात दिसत आहे आणि त्याची ही कृती पाहून चाहतेही नाराज झाले आहेत. सोशल मीडियावरील या व्हिडीओत चाहत्यांनी BCCIकडे सिराजवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सर्वाधिक १३ विकेट्स घेणारा सिराज चेन्नई कसोटीत प्लेईंग इलेव्हनमध्ये नाही, कुलदीप यादवलाही बाकावरच बसवले आहे. या दोघांच्या जागी संघात अनुक्रमे इशांत शर्मा व शाहबाज नदीम यांना संधी मिळाली आहे. हा व्हिडीओ ड्रेसिंग रुमच्या बाहेरचा आहे. आता बीसीसीआय या प्रकरणाचा तपास करून काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी २०१३मध्ये वेस्टइंडिज विरुद्धच्या सामन्यात सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा यांच्यात भांडण झालं होतं. रैनानं जडेजाची जर्सी खेचली होती. अन्य खेळाडूंनी त्यांचं भांडण सोडवलं.