IND vs AUS T20 2022 Live : पहिला हाफ उत्तम गेला, पण तीन चुकांमुळे भारताने सामना गमावला; Rohit Sharma ही तेच म्हणाला...

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - भारताला २०८ धावांचा यशस्वी बचाव नाही करता आला. कॅमेरून ग्रीन व स्टीव्ह स्मिथ यांच्या झंझावातानंतरही उमेश यादवने सामना फिरवला होता. त्याने एका षटकात दोन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंता निर्माण केली, परंतु माशी शिंकली...

नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजीला आला. रोहित ( ११ ) व विराट ( २) धावांवर माघारी परतले. २ बाद ३५ वरून लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी भारताला डाव सावरला. लोकेश व सूर्यकुमार यादव यांची ४२ चेंडूंवरील ६८ धावांची भागीदारी केली. लोकेश ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर माघारी परतला. सूर्याने २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावा केल्या.

अक्षर पटेल ( ६) व दिनेश कार्तिक ( ६) आज फार कमाल करू शकले नाही. हार्दिक पांड्याचे वादळ नंतर घोंगावले. त्याने २०व्या षटकात सलग तीन षटकार खेचले आणि ३० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. भारताने ६ बाद २०८ धावांचा टप्पा गाठला. २०१३मध्ये भारताने राजकोट येथे ऑसींविरुद्ध ४ बाद २०२ धावा केल्या होत्या.

कॅमेरून ग्रीन व आरोन फिंच ( २२) यांनी ऑस्ट्रेलियाला आक्रमक सुरुवात करून दिली. अक्षर पटेलने ही भागीदारी संपुष्टात आणली. ४४ धावांवर ग्रीनचा झेल अक्षर पटेलकडून सुटला. नवव्या षटकात लोकेश राहुलकडून स्मिथचा ( १८) झेल सुटला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त प्रथमच सलामीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. स्मिथला आधी LBW करण्याची संधी DRS न घेतल्याने गमावली, त्यानंतर हे दोन झेल सुटणे महागात पडले.

अक्षरच्या गोलंदाजीवर ग्रीनने पुन्हा उत्तुंग फटका मारला अन् विराटने सुरेख झेल टिपला. ग्रीन ३० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारासह ६१ धावा करून बाद झाला. १२ व्या षटकात उमेश यादवने ( Umesh Yadav) ऑसींना दोन मोठे धक्के दिले. स्मिथ ३५ आणि मॅक्सवेल १ धावेवर बाद झाला.

अक्षरने आणखी एक विकेट घेत जोश इंग्लिसला ( १७) बाद केले. अक्षरने ४ षटकांत १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. अक्षर वगळता अन्य गोलंदाजांनी १५.२ षटकांत १९४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. भारताच्या गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी पराभवास कारणिभूत ठरली.

ऑस्ट्रेलियाला हाताशी ५ विकेट्स असताना ३० चेंडूंत ६१ धावा हव्या होत्या. हर्षल पटेलने १६व्या षटकात चौकार खाऊनही ६ धावा दिल्या. पण, भुवीने टाकलेल्या १७व्या षटकात १५ धावा मिळाल्या. १८ चेंडूंत ४० धावा हव्या असताना हर्षलचा पहिलाच चेंडू मॅथ्यू वेडने सीमापार पाठवला. पुढच्याच चेंडूवर हर्षलेन रिटर्न कॅच टाकला. त्या षटकात २२ धावा कुटल्या.

आता ऑसींना १२ चेंडूंत १८ धावा करायच्या होत्या अन् भुवीच्या षटकात १६ धावा आल्या. ६ चेंडूंत २ धावा हव्या असताना टीम डेव्हिड १८ धावांवर बाद झाला, पण त्यानंतर आलेल्या पॅट कमिन्सने चौकार खेचून ऑसींचा विजय पक्का केला. ४ विकेट्सने हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मॅथ्यू वेड २१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला.

१८ व १९ व्या षटकात अनुक्रमे २२ व १६ धावा आल्या तिथेच भारताने सामना गमावला. सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. २०८ धावांचा यशस्वी बचाव करता आल्या असत्या आणि त्याचवेळी क्षेत्ररक्षणातील चूकाही महागात पडल्या. फलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. आम्ही नेमकं कुठे चुकलो, हे या सामन्यात आम्हाला कळले आणि पुढील सामन्यात कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करू.''