उगाच रडू नका; पाकिस्तान दौऱ्यावर माझा डोळा फुटला असता; इरफान पठाणने PCBला सुनावलं

icc odi world cup 2023 : १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

१२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी जगभरातील दहा संघ भारतात आले आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघ देखील तब्बल ७ वर्षांनंतर भारतीय भूमीवर खेळत आहे.

विश्वचषकाला सुरूवात झाल्यापासूनच काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सलामीच्या सामन्याकडे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ असो की मग पाकिस्तानी खेळाडूची वादग्रस्त कृती.

भारतात होत असलेल्या स्पर्धेकडे चाहत्यांनी पाठ फिरवली असल्याचा बाऊ काही पाकिस्तानी माजी खेळाडू करत आहेत. याशिवाय शेजारचे भारतीय चाहत्यांवर टीका करत आहेत. याबद्दल बोलताना भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने पाकिस्तानात त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.

पठाण वन डे विश्वचषकात समालोचनाच्या माध्यमातून चाहत्यांचा उत्साह वाढवत आहे. अनेकदा सोशल मीडियावरून पाकिस्तानी चाहत्यांची फिरकी घेणाऱ्या पठाणने आता उघडपणे शेजाऱ्यांना लक्ष्य केले.

पठाणने सांगितले की, आम्ही पाकिस्तानातील पेशावर येथे सामना खेळत होतो. त्यावेळी एका पाकिस्तानी चाहत्याने माझ्या दिशेने खिळा भिरकावला. पण आम्ही या गोष्टीला जास्त भाव दिला नाही किंबहुना याचा बाऊ केला नाही. तो खिळा जर लागला असता तर माझ्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असती.

"आम्ही पाकिस्तानच्या धरतीवर चांगले क्रिकेट खेळत होतो. त्यामुळे संतापलेल्या पाक चाहत्यांनी असे केले असावे. तेव्हा कदाचित माझा डोळा फुटलाच असता. सामना १० मिनिटे थांबला देखील होता", असेही इरफानने सांगितले.

तसेच भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल केल्याचा दाखला देत तो म्हणाला, "पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय चाहत्यांच्या वर्तनापेक्षा आपल्या खेळाकडे अधिक लक्ष द्यायला हवे. या गोष्टी जिथल्या तिथे ठेवायला हव्यात."

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अहमदाबाद येथे भारताविरूद्धच्या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या वर्तनाबाबत आयसीसीकडे तक्रार केली आहे. याबद्दल बोलताना पठाणने भारत विरूद्ध बांगलादेश सामन्यात समालोचन करताना शेजाऱ्यांवर निशाणा साधला.