Virendra Sehwag Birthday: 'डॅडी हंड्रेड'चा बादशाह आहे आपला वीरू, धुरंधर गोलंदाजांना फुटायचा घाम!

Virendra Sehwag Birthday: क्रिकेटमध्ये शतक आणि द्विशतकांची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील पण वीरेंद्र सेहवाग एक असा फलंदाज ठरला की ज्यानं सलामी फलंदाजीची परिभाषाच बदलली.

भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा आज वाढदिवस आहे. सेहवागनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्रिशतक, द्विशतक आणि शतक तर ठोकलंच पण 'डॅडी हंड्रेड'साठीही तो ओळखला जातो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात सलामीला आक्रमक आणि बिनधास्त फलंदाजी कशी करायची हे सेहवागनं संपूर्ण क्रिकेट विश्वाला दाखवून दिलं.

कसोटी क्रिकेटमधील सेहवागच्या स्ट्राइक रेटची आकडेवारी पाहायची झाली तर सर्व हैराण होतील. जगातील मातब्बर फलंदाजांचा वन-डे क्रिकेटमध्ये जितका स्ट्राइक रेट असतो त्याहून अधिक स्ट्राइक रेटनं वीरू कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी केलीय.

वीरेंद्र सेहवागचा आज म्हणजेच २० ऑक्टोबर २०२१ रोजी ४३ वा वाढदिवस आहे. सेहवाग क्रिकेट विश्वातील एकमेव असा फलंदाजी आहे की ज्यानं कसोटी क्रिकेट ठोकलेल्या एकूण शतकांपैकी अर्ध्याहून अधिक शतकं १५० धावांपेक्षाही अधिक धावसंख्येची आहेत.

१५० धावांपेक्षा अधिक धावा केलेल्या शतकाला क्रिकेटमध्ये 'डॅडी हंड्रेड' म्हटलं जातं. सेहवागनं कसोटी क्रिकेटमध्ये ८२.२३ च्या स्ट्राइकरेटनं धावा केल्या आहेत. म्हणजेच १०० चेंडूंमागे ८२ धावा. असा स्ट्राइक रेटतर वनडे क्रिकेटमध्ये कुमार संगकारा, रिकी पाँटिंग आणि माहेला जयवर्धने यांचाही राहिलेला नाही.

कमीत कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्यावरच सेहवाग विश्वास ठेवत आला आहे. चेंडू खेळून काढण्यात त्याला कधीच रस नव्हता. चौकार आणि षटकारांमध्येच त्याची बॅट बोलायची अन् एकदा का सेहवागची बॅट बोलू लागली की मग प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फुटायचा.

सेहवागच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये २ त्रिशतकं जमा आहेत. तर तिसऱ्यांदा असा कारनामा करण्यासाठी तो केवळ ७ धावांनी हुकला होता. एका कसोटीत सेहवाग २९३ धावांवर बाद झाला होता. सेहवागनं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ६ द्विशतकं ठोकली आहेत.

'डॅडी हंड्रेड'चं बोलायचं झालं की सेहवागनं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २३ शतकं ठोकली आहेत. यातील १३ शतकं तर १५० हून अधिक धावांची नोंद केलेली आहेत. यातूनच सेहवागचा फक्त 'हंड्रेड' नव्हे, तर 'डॅडी हंड्रेड' करण्यावर भर राहिला असल्याचं दिसून येतं.

सेहवागची आणखी एक खास बाब म्हणजे २०१५ साली आपल्या वाढदिवशीच क्रिकेटच्या तिनही प्रकारातून निवृत्तीची घोषणा त्यानं केली होती. सेहवागनं २०१३ साली आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर सेहवागला भारतीय संघात कधी जागा मिळू शकली नाही. त्यामुळे वयाच्या ३७ व्या वर्षी सेहवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.