मोहालीच्या मैदानात गेल बरसला

मोहाली : ख्रिस गेलने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

गेलच्या शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 193 धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग सनरायझर्स हैदराबादला करता आला नाही आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला.

गेल आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असला तरी ठरवल्यावर आपण काहीही करू शकतो, हे गेलने गुरुवारी दाखवून दिले.

गेलने यावेळी 20 षटके पूर्ण खेळली. गेलने 39 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले तेव्हा तो शतकाची वेस पार करेल, असे कुणाला वाटलेही नव्हते.

गेलने आपल्या शतकी खेळीत फक्त एक चौकार लगावला असला तरी तब्बल 11 षटकारांची आतिषबाजी केली. आपल्या शतकातील 66 धावा त्याने षटकारांच्या जोरावर लुटल्या.

गेलने यावेळी 63 चेंडूंत नाबाद 104 धावांची खेळी साकारत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देण्यात मोलाचा वाटा उचलला.

पंजाबचा संघ माझ्यासाठी नवीन आहे. मला अजून बरेच काही सिद्ध करायचे आहे असे अनेक लोक म्हणतील. पण मी असे म्हणेन की, विरेंद्र सेहवागने माझी निवड करुन आयपीएलला वाचवले आहे. ही एक चांगली सुरुवात आहे, असे यावेळी गेल म्हणाला.