टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून गंभीरच येणार, पण पगारावर अडलं घोडं; किती कोटींची केली मागणी?

मुख्य प्रशिक्षक म्हणून मिळणाऱ्या पगाराबाबत गौतम गंभीर आणि बीसीसीआयमध्ये अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला नमवत १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक जिंकण्याची किमया केली. या विजयानंतर भारतीय संघात अनेक मोठे बदलही होणार आहेत. कर्णधार रोहित शर्मासह स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी टी-२०तून निवृत्तीची घोषणा केली आहे. तसंच राहुल द्रविडचाही मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे.

राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचं नाव सर्वांत आघाडीवर आहे.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचं नाव जवजवळ निश्चित मानलं जात आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल संघाकडून गंभीरला फेअरवेलही देण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी बीसीसीआयकडून गंभीरच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

मुख्य प्रशिक्षक म्हणून मिळणाऱ्या पगाराबाबत गौतम गंभीर आणि बीसीसीआयमध्ये अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पगाराबाबत गौतम गंभीरचं समाधान झाल्यानंतरच प्रशिक्षक म्हणून त्याच्या नावाची घोषणा बीसीसीआयकडून केली जाणार आहे. मात्र गंभीरला माजी प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यापेक्षा अधिक पगार मिळणार हे निश्चित आहे.

राहुल द्रविडला प्रशिक्षकपदी असताना वार्षिक १३ कोटी इतकं मानधन मिळत होतं. मात्र तितक्या रकमेवर गौतम गंभीर समाधानी नाही. गंभीरने वार्षिक १२ कोटींहून अधिक रकमेची मागणी बीसीसीआयकडे केल्याचे समजते.

प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा राष्ट्रीय स्तरावर हा पहिलाच अनुभव असणार आहे. यापूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स या आयपीएलमधील दोन संघांसोबत काम केलं आहे.

दरम्यान, राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्याने सध्या व्ही. व्ही. एस लक्ष्मण भारताचे हंगामी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.