रेकॉर्ड ब्रेकिंग वर्ल्ड कप! विराट, शमी, रोहित ठरले जगात भारी; ICC कडून विक्रमांची लिस्ट जाहीर

ICC ODI World Cup 2023 All Records : भारतात पार पडलेला वर्ल्ड कप हा आकडेवारीने आतापर्यंत झालेल्या सर्वच वर्ल्ड कप स्पर्धांवर भारी पडला. विराट कोहलीच्या रेकॉर्ड ब्रेकिंग धावा, मोहम्मद शमीचा भेदक मारा आणि हिटमॅन या नावाला शोभेसा रोहित शर्माचा खेळ... असे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड या वर्ल्ड कपमध्ये तुटले... काही नव्याने लिहिले गेले. चला मग जाणून घेऊयात हे विक्रम

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड हा दुसरा फलंदाज ठरला आहे. भारतीय संघाच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा हेडने १९ नोव्हेंबर २०२३ मध्ये केला. त्याच्या १३७ धावांनी ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. १९९६ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेच्या अरविंद डी सिल्वा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १०७ धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप फायनलमध्ये आतापर्यंत ७ फलंदाजांना शतक झळकावता आले आहे, परंतु धावांचा पाठलाग करताना तिहेरी आकडा ठोकणारे दोघेच.

ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान भारतीय संघावर ६ विकेट्सने विजय मिळवला आणि सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये जाणारा आणि सर्वाधिक ६ वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव संघ हा ऑस्ट्रेलियाचा आहे. १९८७मध्ये अॅलेन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिला वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर १९९९, २००३, २००७, २०१५ व २०२३ मध्ये बाजी मारली. १९७५ व १९७९ मध्ये वेस्ट इंडिजने आणि १९८३ व २०११ मध्ये भारताने वर्ल्ड कप उंचावला होता.

विराट कोहलीने वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक ७६५ धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्याने ९५.६२च्या सरासरीने या धावा केल्या आणि त्यात ३ शतकांचा समावेश होता. त्याने सचिन तेंडुलकरचा ६७३ धावांचा ( २००३) विक्रम मोडला.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० शतकं झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही विराटने या वर्ल्ड कप स्पर्धेत पूर्ण केला. या स्पर्धेपूर्वी विराटच्या नावावर वन डेतील ४७ शतकं होती आणि त्याने बांगलादेसविरुद्ध नाबाद १०३, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०१ धावा करून सचिनच्या ४९ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर उपांत्य फेरीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध ११७ धावा करून शतकांचे अर्धशतक पूर्ण केले.

मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी १७ इनिंग्जमध्ये ५० विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शमीला संधी मिळाली आणि न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट्स घेत त्याने छाप पाडली. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने ५७ धावांत ७ विकेट्स घेतल्या आणि भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. २०१४ मध्ये स्टुअर्ट बिन्नीने बांगलादेशविरुद्ध ४ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये एख शतक झळकावले आणि वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक ७ शतकांचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने या स्पर्धेत ५४.२७ च्या सरासरीने ५९७ धावा केल्या. वर्ल्ड कप मध्ये ५४ षटकार खेचणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात वेगवान ( ४० चेंडू) शतक झळकावले. त्याने नेदरलँड्सविरुद्ध ७ चौकार व ८ षटकारांसह हा पराक्रम केला. लक्ष्याचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेल हा द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद ९१ अशी झाली होती आणि मॅक्सवेल उभा राहिला त्याने २०१ धावांची नाबाद खेळी करून २९२ धावांचे लक्ष्य पार केले.

वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक ४२८ धावांचा आणि एका पर्वात सर्वाधिक ९ शतकांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने नोंदवले. दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व एडन मार्कराम यांच्या शतकांच्या जोरावर श्रीलंकेविरुद्ध ५ बाद ४२८ धावा केल्या. २०१५मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ६ बाद ४१७ धावा केल्या होत्या. मार्करामने वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वेगवान ( ४९ चेंडूंत) शतकाचा विक्रम याच सामन्यात नोंदवला. आफ्रिकेच्या संघाने या स्पर्धेत सर्वाधिक ९ शतकं झळकावली. शिवाय त्यांनी एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ४ वेळा साडेतीनशेपार धावा करण्याचा विक्रमही नोंदवला. ९९ षटकार त्यांच्या नावावर होती आणि हाही वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.