नाव मोठे....! कोट्यवधी घेऊन या खेळाडूंनी फ्रँचायझींना लावला चूना!

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये, गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्सचा संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे. काही संघ अद्यापही प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आपण अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांना या हंगामात करोडोंमध्ये विकत घेतले गेले, परंतु त्यांना काही खास कामगिरी करता आली नाही

हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने १३.२५ कोटींना विकत घेतले पण तो आपल्या संघासाठी पूर्णपणे फ्लॉप दिसत होता. या मोसमात त्याच्या बॅटमधून पहिलं शतक झळकावलं असलं, तरी त्याला त्याच्या योग्यतेनुसार संघासाठी खेळ दाखवता आला नाही.

आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी प्रथमच मैदानात उतरणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेही पूर्णपणे निराश केले. मुंबईने त्याला ८ कोटींना विकत घेतले. गोलंदाजीत तो निष्प्रभ राहिला आणि त्याचवेळी दुखापतही त्याच्यासाठी मोठी समस्या बनली. या मोसमात त्याने संघासाठी ५ सामने खेळले ज्यात त्याला फक्त २ विकेट मिळाल्या.

आयपीएलच्या १६व्या हंगामात बेन स्टोक्स चेन्नई सुपर किंग्जमध्ये सहभागी झाला होता. संघाने त्याला १६.२५ कोटींना खरेदी केले. पहिल्या काही सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता पण त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर राहिला. या मोसमात तो सीएसकेसाठी केवळ दोन सामन्यांमध्ये दिसला.

इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करनवर पंजाब किंग्ज संघाने १८.५० कोटींची बोली लावली होती. तसेच तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र, तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. सॅमने या मोसमात एकूण १२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फलंदाजीत २१६ धावा आणि गोलंदाजीत फक्त ७ विकेट्स घेतल्या आहेत.

सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल २०२३ मध्ये खेळलेल्या मयांक अग्रवालला १६व्या हंगामात संघाने ८.२५ कोटींमध्ये खरेदी केले होते. या मोसमात मयंकला एकूण ९ सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यामध्ये तो केवळ १८७ धावा करू शकला.

दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात वेगवान गोलंदाज मुकेश कुमारवर मोठी बोली लावली. फ्रँचायझीने त्याला तब्बल ५.२५ कोटींना विकत घेतले. मुकेशला ९ सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याला फक्त ७ विकेट घेता आल्या.