रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट! संघ निवडीच्या बैठकीत मला सोडून नको असलेली माणसं असायची

Indian Cricket Team: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी BCCI च्या निवड समितीच्या बैठकीत होणाऱ्या घटनाबाह्य प्रसंगाबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.

भारतीय संघासोबतच्या ७ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही त्यांना निवड समितीच्या बैठकीत बोलावले गेले नसल्याचा दावा शास्त्रींनी केला आहे. त्यांनी असाही दावा केलाय की, या बैठकीत ज्या व्यक्ती असायला नको होत्या त्याही असायच्या. पण, त्यांनी त्या व्यक्ती कोण, हे सांगितलेले नाही. आता शास्त्रींच्या या दाव्यामुळे पुन्हा भारतीय क्रिकेटमध्ये एक खळबळ उडण्याची शक्यता आहे.

ESPN Cricinfo ला दिलेल्या मुलाखतीत भारतीय क्रिकेटच्या निवड समितीच्या बैठकीत होणाऱ्या घटनाबाह्य प्रकारावर त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले,''माझ्याकडे संघनिवडीचा अनुभव नाही. सात वर्ष मी भारतीय संघासोबत होतो, परंतु मी एकदाही निवड समितीच्या बैठकीत जाऊ शकलो नाही. मला बोलावले गेलेच नाही. मागील काही वर्षांत निवड समितीच्या बैठकीत भलतीच माणसं दिसायची, जी घटनेनुसार असायला नको होती.''

रवी शास्त्री यांनी निवड समितीच्या बैठकीत मुख्य प्रशिक्षक असायला हवा, अशी मागणी केली. मग त्याला त्याचं मत मांडण्याची संधी नसली तरी किमान त्याला निवड समितीचे मत जाणता येईल.

''प्रशिक्षक म्हणून तुम्ही खेळाडूंसोबत बराच वेळ घालवता. ते महत्त्वाचे आहे. पण निवडकर्ते काय विचार करत आहेत, हे जाणून घ्यायला हवे आणि मग संघासाठी कोणती गोष्ट योग्य आहे ते ठरवता येईल. बैठक कशी सुरू होते, कशी संपते, मीटिंगमध्ये कोण आहेत याची मला शून्य कल्पना आहे.''

२०१४ मध्ये शास्त्री इंग्लंड दौऱ्यात संचालक म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा भाग बनले. २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत ते संचालक पदावर राहिले. अनिल कुंबळे यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर, शास्त्री यांनी त्यांची जागा घेतली. शास्त्री यांनी २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत साडेचार वर्षे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले.