विराट कोहलीसाठी ODI कर्णधारपद सोडणं कसं ठरू शकेल वरदान; माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी सांगितलं

टीम इंडियाच्या नेतृत्वावरून वाद सुरू असतानाच माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी रविवारी मोठे वक्तव्य केले.

Ravi Shastri On Virat Kohli : टीम इंडियाच्या नेतृत्वावरून वाद सुरू असतानाच माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी रविवारी मोठे वक्तव्य केले. विराटच्या जागी रोहित शर्मा याला वन डे, तसेच टी-२० संघाचा कर्णधार नेमण्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.

टी २० वर्ल्डकप संपल्यानंतर रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून करार संपुष्टात आला. तसंच वर्ल्डकपपूर्वीच विराट कोहलीनं त्या मालिकेनंतर टी २० फॉर्मेटचं कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आपण वन डे आणि कसोटी सामन्यात कर्णधार राहणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं.

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी विराटकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं. यानंतर यावरून मोठ्या प्रमाणात वादही झाले. रवी शास्त्री यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आपलं मत व्यक्त केलं. तसंच विराटकडून वन डे चं कर्णधारपद जाणं त्याच्यासाठी भविष्यात कसं वरदान ठरू शकतं हेदेखील सांगितलं.

शास्त्री म्हणाले, ‘माझ्या मते, कसोटी आणि वन डे प्रकारात दोन वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा निर्णय योग्य आहे. सध्याची वेळ देखील अशीच आहे की एक खेळाडू तीनही प्रकारात संघाचे नेतृत्व करू शकत नाही. बीसीसीआयचा हा निर्णय विराट आणि रोहित या दोघांसाठीही उपयुक्त ठरला आहे.’

विराटने आता खेळावर पूर्ण लक्ष द्यायला हवे, अशी सूचना करताना शास्त्री म्हणाले, ‘विराट कोहली आता कसोटी क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतो. विराट जोपर्यंत चांगली कामगिरी करीत राहील तोपर्तंत तो कसोटीत देशाचे नेतृत्व करू शकतो. वन डे संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे विराटला भरपूर संधी असेल. त्याच्याकडे आणखी ५-६ वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये देदीप्यमान कामगिरीसाठी शिल्लक आहेत.’