Asia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल?

साखळी गटात अपराजीत राहिलेला भारतीय संघ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर गटात बांगलादेशचा सामना करणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवल्यानंतर भारत अंतिम फेरीत आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. मात्र, या लढतीपूर्वी भारतीय संघाला दुखापतीने वेढले आहे आणि त्यामुळेच त्यांना आपल्या तीन खेळाडूंना माघारी पाठवावे लागले.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला पाठीच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे आता कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळेच गोलंदाज भुवनेश्वर कुमारला विश्रांती मिळू शकते. भुवनेश्वर सलग दोन दिवस सामने खेळला आहे. त्यानेच पाकिस्तानला सुरूवातीलाच हादरे देत विजयाचा पाया रचला होता.

अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर यांनाही दुखापतीमुळे संघाबाहेर पडावे लागले. त्यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भुवनेश्वरच्या जागी खलील अहमदला संधी मिळू शकते, परंतु पंड्याच्या जागी कोण खेळेल हे अद्याप स्पष्ट नाही.

पंड्याच्या जागी दीपक चहरला पाचारण करण्यात आले आहे, परंतु तो अंतिम अकरामध्ये जागा मिळवेल याची शक्यता कमीच आहे. मनीष पांडेला मधल्याफळीत संधी मिळू शकते. केदार जाधव गोलंदाजीनेही प्रभावित करत आहे आणि तो पंड्याची उणीव भरून काढू शकेल.

महेंद्रसिंह धोनीचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी रोहित त्याला वरच्या क्रमांकावर खेळवतो का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.