विराट कोहलीसाठी वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने भारतीय खेळाडू खेळतील - वीरेंद्र सेहवाग

भारतीय संघ २०११ च्या वर्ल्ड कप विजयाची पुनरावृत्ती यंदा करतील असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केला. ( Former India opener Virender Sehwag )

२०११ मध्ये ज्या प्रमाणे भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरला वर्ल्ड कप जिंकून देण्याच्या निर्धाराने खेळले होते, तसेच यंदा विराट कोहलीसाठी ( Virat Kohli ) जगज्जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय खेळाडू प्रयत्न करतील, असे सेहवाग म्हणाला.

भारताने २०११ मध्ये श्रीलंकेला पराभूत करून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप उंचावला होता. महान फलंदाज सचिन तेंडुलकरची ही शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा होती आणि संघाने त्याला वर्ल्ड कप विजयाची भेट दिली. सहाव्या प्रयत्नात सचिन वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरला होता. २०११ च्या त्या संघातील विराट सदस्य होता आणि त्याने सचिनला त्यावेळी आपल्या खांद्यावर उचलून वानखेडे स्टेडियमवर विजयी प्रदक्षिणा मारली होती. २०११ नंतर भारताला वन डे वर्ल्ड कप जिंकता आला नाही. २०१५ व २०१९ मध्ये उपांत्य फेरीत त्यांना हार पत्करावी लागली होती.

सचिनच्या निवृत्तीनंतर विराट हा भारताचा रन मशीन ठरला आहे आणि २०२३ मध्ये त्याच्यासाठी टीम इंडिया खेळेल असा विश्वास सेहवागला आहे. आयसीसीच्या वर्ल्ड कप वेळापत्रकासाठीच्या कार्यक्रमात सेहवाग म्हणाला,''आम्ही तेंडुलकरसाठी तो वर्ल्ड कप खेळलो. वर्ल्ड कप जिंकून आम्ही सचिन पाजीला सर्वोत्तम निरोप दिला होता. आता विराट कोहली त्याच्या जागी आहे. त्याच्यासाठी प्रत्येक जण वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्याने नेहमीच संघासाठी १०० टक्क्यांहून अधिक योगदान दिलं आहे.''

''हा वर्ल्ड कप जिंकण्याचा विराटचाही प्रयत्न असेल, असे मला वाटते. १ लाख लोकं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल पाहायला येणार आहेत. विराट कोहलीला ही खेळपट्टी चांगलीच माहित्येय. तो धावाचा पाऊस पाडेल आणि भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी सर्वोत्तम खेळेल, असा मला विश्वास आहे,''असे वीरू म्हणाला.

या वेळापत्रकात सर्वांना एका सामन्याची उत्सुकता होती आणि तो भारत-पाकिस्तान मुकाबला १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. सेहवागनेही या सामन्याबाबत उत्सुकता दाखवली आहे. तो म्हणाला, त्या दिवशी नेमकं काय घडेल, याबाबत मला खात्री नाही, परंतु जो संघ दडपण योग्य पद्धतीने हाताळेल, तो जिंकेल. भारतीय संघ दडपण योग्य रितीने हाताळत आलाय आणि त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेत ते पाकिस्तानवर भारी पडले आहेत. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होईल.