बापरे! गोलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजाचा गुडघा सरकला, करिअर संपलं!

India vs England Test : कोणताही खेळ म्हटलं की दुखापत ही आलीच. पण काही दुखापती या अतिशय गंभीर ठरतात आणि त्यानं एखाद्याचं करिअरच संपुष्टात येऊ शकतं. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या निमित्तानं क्रिकेट विश्वातील अशाच एका घटनेची माहिती आपण जाणून घेऊयात...

फेब्रुवारी १९९२ साली वेलिंग्टनमध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना सुरू असतानाची ही गोष्ट आहे. सामना अनिर्णीत राहीला. पण या सामन्यानं इंग्लंडच्या एका वेगवान गोलंदाजाचं करिअर संपुष्टात आलं. त्या खेळाडूचं नाव आहे डेव्हिड लॉरेंस (David Lawrence)

६ फेब्रुवारी १९९२ साली खेळवला गेलेला कसोटी सामना डेव्हिट लॉरेंससाठी त्याच्या करिअरमधील शेवटचा सामना ठरला. लॉरेन्सला झालेली दुखापत पाहून स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांच्याही काळजाचा ठोका चुकला होता.

डेव्हिड लॉरेन्स यांनी पहिल्या डावात २७ षटकं टाकली होती आणि एक विकेट देखील मिळवली होती. पण दुसऱ्या डावात आपलं वैयक्तिक तिसरं षटक टाकण्यासाठी धाव घेत असतानाच लॉरेन्स खाली कोसळले. त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर होती की लॉरेन्स खाली कोसळताच वेदनेनं विव्हळताना दिसले.

डेव्हिड लॉरेन्स मैदानातच खाली कोसळून वेदनेनं विव्हळत होते. त्यांचे अश्रू आणि वेदना पाहून प्रेक्षकंही जागेवर उठून उभे राहिले. संपूर्ण स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली होती.

लॉरेन्स गोलंदाजीसाठी धाव घेत असताना असे अचानक कोसळ्याचं पाहून काहींना असं वाटलं की लॉरेन्स यांच्यावर गोळीबार झाला की काय? पण धावताना त्यांच्या गुडघा सरकल्यानं त्यांना वेदना होऊ लागल्या होत्या. वेदना इतका भयंकर होत्या की ते जागचे खाली कोसळले होते.

डेव्हिड लॉरेन्स यांचं क्रिकेट करिअर या घटनेनं पूर्णपणे संपुष्टात आलं. त्यांना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करता येऊच शकलं नाही आणि वयाच्या २९ व्या वर्षी यांना क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडचा हा कसोटी सामना अनिर्णीत राहीला. पण इंग्लंडनं आपल्या संघातील एका वेगवान गोलंदाजाला गमावला.