Sanju Samson: किशन-पंतवर BCCI 'मेहरबान', संजू सॅमसनच्या मागून पदार्पण करून खेळले 'दुप्पट' सामने

भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 मालिकेत 1-0 ने विजय मिळवला.

भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना आज नेपियर येथे खेळवण्यात आला. भारतीय संघाला मालिकेत विजय मिळवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे होते. मात्र पावसाने केलेल्या बॅटिंगमुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 1-0 ने मालिकेवर कब्जा केला आहे.

यजमान न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करून 160 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 4 बाद 75 धावांवर खेळत होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करावा लागला. यासोबतच भारताने 1-0 ने मालिका जिंकली. भारतीय गोलंदाजी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे किवी संघ 19.4 षटकांत सर्वबाद झाला.

3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी मोठा विजय मिळवून आघाडी घेतली होती. आजचा सामना निर्णायक होता, मात्र याचा निकाल पावसामुळे लागला आणि किवी संघाचे मोठे नुकसान झाले. सामना रद्द झाल्यामुळे भारताने 1-0 ने मालिका जिंकली अशी माहिती बीसीसीआयने दिली.

खरं तर या सामन्यात देखील भारताचा सलामीवीर रिषभ पंत पूर्णपणे फेल ठरला. पंत पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतल्यानंतर सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. आजच्या सामन्यात भारताचे सलामीवीर ईशान किशन आणि रिषभ पंत स्वस्तात माघारी परतले. किशन (10), रिषभ पंत (11) तर श्रेयस अय्यर खातेही न उघडता तंबूत परतला. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि दीपक हुडा खेळपट्टीवर होते. लक्षणीय बाब म्हणजे पावसामुळे आजचा सामना अनिर्णित राहिला आणि त्यामुळे मालिका भारताच्या नावावर झाली.

अखेरच्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र बीसीसीआयने पुन्हा एकदा रिषभ पंतवर विश्वास दाखवला. परंतु पंतला मिळालेल्या संधीचं सोनं करता आले नाही. पंत केवळ 11 धावा करून तंबूत परतला. मात्र 7 वर्षांपूर्वी पदार्पण केलेल्या सॅमसनला संघात स्थान का दिले जात नाही असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

संजू सॅमसनने 7 वर्षांत आतापर्यंत केवळ 16 सामने खेळले आहेत, तर ऋषभ पंतने 2017 मध्ये पदार्पण करून देखील तब्बल 64 सामने खेळले आहेत. याशिवाय 2021 मध्ये भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने आतापर्यंत 19 सामने खेळले आहेत. एकूणच पंतने सॅमसनपेक्षा 48 सामने अधिक खेळले आहेत. यावरूनच आता भारतीय संघाच्या संघनिवड समितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

न्यूझीलंडविरूद्धच्या अखेरच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला दिनेश कार्तिकने सूर्यकुमार यादवला विश्रांती देऊन सॅमसनला संधी देण्याचा सल्ला दिला होता. रिषभ पंतची टी-20 मधील आतापर्यंतची कामगिरी देखील निराश करणारी आहे. त्याने 66 सामन्यांमधील 56 डावांमध्ये 987 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी 22.43 तर स्ट्राईक रेट 126.37 असा राहिला आहे. 3 वेळा अर्धशतक करणाऱ्या पंतची सर्वोत्तम धावसंख्या ही 65 आहे.

यावर्षी टी-20 मध्ये चांगली खेळी करूनही अद्याप संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. सॅमसनने 2022 मध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 44 च्या सरासरीने आणि 158 च्या स्ट्राईक रेटने 179 धावा केल्या आहेत. साहजिकच आगामी काळात भारतीय संघातून रिषभ पंतचा पत्ता कट होऊ शकतो.

आजचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे भारतीय संघाने टी-20 मालिकेवर कब्जा केला. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 4-4 बळी पटकावून किवी संघाला गारद केले. आजच्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार सिराजला घोषित झाला. तर दुसऱ्या सामन्यात 51 चेंडूत 111 धावांची खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज.

भारतीय संघ आता न्यूझीलंडविरूद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवनकडे भारतीय संघाचे नेतृत्व असणार आहे. त्यामुळे आगामी एकदिवसीय मालिकेत संजू सॅमसनला संधी मिळते की नाही हे पाहण्याजोगे असेल. एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच उमरान मलिक, दीपक चहर आणि कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे.

न्यूझीलंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.