मराठी माणसाने मोडला असता सर डॉन ब्रॅडमन यांचा वर्ल्ड रेकॉर्ड; पण, प्रतिस्पर्ध्यांनी मैदान सोडले

सर डॉन ब्रॅडमन.... क्रिकेट विश्वातील हे खूप मोठं नाव... त्यांच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत आणि ते आजतागायत कायम आहेत. पण,

महाराष्ट्राच्या भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर ( BB Nimbalkar ) यांना डॉन ब्रॅडमन यांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. पण, विरोधी संघाने मैदान सोडले अन् निंबाळकर यांना वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करता आला नाही.

१९४८ मध्ये पूना क्लब ग्राऊंडवर महाराष्ट्र आणि काठियावाड यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यानचा हा किस्सा आहे. प्रथम फलंदाजी करताना, काठियावाड संघाचा पहिला डावात केवळ २३८ धावांत गडगडला. त्यांचा कर्णधार राजकोटच्या ठाकोर साहेबाने ७७ धावा केल्या आणि ती त्यांची १३ सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या होती.

प्रत्युत्तरात महाराष्ट्राने ४ बाद ८२६ धावा केल्या होत्या आणि तिसऱ्या दिवशी चहापान झाल्यानंतर खेळाडू पेव्हेलियनमध्ये गेले. सामन्यात एक सत्र आणि एक दिवस शिल्लक होता. निंबाळकर ४४३ धावांवर फलंदाजी करत होते, सर ब्रॅडमन यांचा ( ४५२ धावा वि. क्वीन्सलँड, १९३०) प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडण्यासाठी निंबाळकर यांना १० धावा करायच्या होत्या.

जेव्हा ब्रेक घेण्यात आला तेव्हा निंबाळकरांसह एकाही खेळाडूला या वर्ल्ड रेकॉर्डची माहिती नव्हती. खेळाडू मैदानावर चहा घेत होते तेव्हा ही बातमी काठियावाड कॅम्पमध्येही पसरली. महाराष्ट्राचा कर्णधार यशवंत गोखले यांनी प्रतिस्पर्धी संघाला आणखी दोन षटकं टाकण्याची विनंती केली. जेणेकरून निंबाळकर ब्रॅडमन यांचा विक्रम मोडू शकले असते. पण, काठियावाडच्या कर्णधाराने त्यांना अधिक धावांची गरज नाही असे सांगून नकार दिला.

काठियावाडच्या कर्णधाराचा तो चुकीचा नव्हता. त्या दिवसांत, अनिर्णित सामने संघाला पहिल्या डावातील आघाडीसह बहाल केले जात होते. त्याचवेळी महाराष्ट्राच्या संघाला सर्वाधिक सांघिक धावसंख्येचा विक्रमही खुणावत होता. रणजी करंडक क्रिकेटमध्ये होळकर संघाचा ( ८ बाद ९१२ डाव घोषित वि. कर्नाटक, १९४६) विक्रम होता.

चहापानानंतर खेळ झाला नाही. काठियावाड संघातील खेळाडूंनी त्यांच्या बॅगा भरल्या आणि घराकडे ट्रेनमध्ये चढण्यासाठी स्टेशनकडे निघाली. निंबाळकरांचा असा विश्वास होता की हा विक्रम आपल्या नावावर व्हावा असे काठियावाड संघाला वाटत नाही. निंबाळकर नंतर म्हणाले, “तुम्ही इतक्या धावा केल्या आहेत, तुम्हाला आणखी कशाला मिळवायचे आहे, असे ते सांगत होते. काठियावाड संघाचे नाव चुकीच्या कारणांमुळे रेकॉर्ड बुकमध्ये येईल असे त्यांच्या कर्णधाराला वाटले. मला काठियावाड संघाचा दृष्टिकोन आवडला नाही.

भारतीय फलंदाजांमध्ये ४००+ धावा करणारे निंबाळकर हे एकमेव खेळाडू आहेत. त्यांनी ८ तास १४ मिनिटे फलंदाजी करत ४९ चौकार आणि एक षटकार लगावला होता. निंबाळकर यांनी ८० प्रथम श्रेणी सामन्यांत ४७.९च्या सरासरीने ४८४१ धावा केल्या आणि त्यात १२ शतकं व २२ अर्धशतकांचा समावेश होता. त्यांनी ५८ विकेट्सही घेतल्या. एवढ्या धावा करूनही ते भारताकडून एकही सामना खेळले नाही. २०१२मध्ये वयाच्या ९२व्या वर्षी त्यांचे निधन झाले.