अर्जुन तेंडुलकरनं कोणत्या नियमानुसार नोंदवलं IPL 2021 Auctionसाठी नाव?; जाणून घ्या उत्तर

१८ फेब्रुवारीला चेन्नईत होणाऱ्या आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Mini Auction) एकूण १०९७ खेळाडूंनी ( ८१४ भारतीय व २८३ विदेशी) या लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे.

त्यात साऱ्यांचे लक्ष वेधले, ते अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) या नावानं. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा तो मुलगा... पण, पुरेसा अनुभव नसताना अर्जुन कोणत्या नियमानुसार पात्र ठरला हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस २० लाख रुपये इतकी असणार आहे. १८ फेब्रुवारीला यंदाच्या आयपीएलसाठी लिलाव होणार आहे.

यात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाईल. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात घेण्यासाठी कोण उत्सुकता दाखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डावखुऱा जलदगती गोलंदाज अर्जुननं मागील महिन्यात मुंबईच्या सीनिअर संघात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 लीगमधून पदार्पण केलं. त्यात त्यानं दोन सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या.

पुद्दुचेरी संघाविरुद्ध त्यानं चार षटकांत ३३ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या आणि एका सामन्यात ३ षटकांत ३४ धावांत १ विकेट घेतली.

मुंबईच्या सीनियर संघाकडून पदार्पण करताच अर्जुन आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला.

जुलै-ऑगस्ट २०१९नंतर २१ वर्षीय अर्जुन प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला उतरला. यापूर्वी त्यानं २०१८मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या चार दिवशीय दोन सामन्यांत १९ वर्षांखालील टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होतं.

अर्जुन यापूर्वी मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळला होता आणि २०१७-१८च्या कूच बिहार ट्रॉफीत त्यानं १९ विकेट्स घेतल्या. त्यात त्यानं दोन सामन्यांत ५-५ विकेट्स घेतल्या होत्या.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो इंग्लंडच्या खेळाडूंसोबत नेट बॉलर म्हणून होता आणि एका यॉर्करवर जॉनी बेअरस्टो दुखापतग्रस्त होता होता वाचला होता.