Arjun Tendulkar: युवराज सिंगच्या वडीलांकडून क्रिकेटचे धडे घेतोय अर्जुन तेंडुलकर; पाहा कशी सुरू आहे तयारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर युवराज सिंगच्या वडीलांकडून गोलंदाजीचे धडे घेत आहे.

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्याच्या नवव्या वर्षी देखील मैदानात धावांचा पाऊस पाडत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकणारा मास्टर ब्लास्टर सचिन सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळत आहे. दुसरीकडे त्याचा मुलगा ज्युनिअर तेंडुलकर आपले करिअर बनवण्याच्या तयारीत व्यस्त आहे.

अर्जुन तेंडुलकरने अद्याप एकही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सामना खेळला नाही. त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या स्क्वॉडमध्ये ठेवले आहे, मात्र अद्याप अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारतीय संघातील त्याच्या पदार्पणाचा मुद्दा फारच दूरचा असल्याचे पाहायला मिळत आहे.

वेगवान गोलंदाज म्हणून जगाला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी अर्जुन तेंडुलकर घाम गाळत आहे. तो मुंबईनंतर गोव्यातील देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. आता तो 27व्या अखिल भारतीय जेपी अत्रे स्मृती क्रिकेट स्पर्धेचा हिस्सा झाला आहे, ज्याचे आयोजन चंडीगडच्या धरतीवर 22 सप्टेंबर पासून सुरू झाले आहे.

या जेपी अत्रे स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर गोव्याकडून खेळणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे या स्पर्धेत 100 हून अधिक असे खेळाडू खेळले आहेत, ज्यांनी पुढे जाऊन भारतीय संघात स्थान मिळवले आहे. अशा स्थितीत अर्जुन तेंडुलकर देखील भारतीय संघात पदार्पण करेल अशी आशा वर्तवली जात आहे.

सिक्सर किंग युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी आपल्या इस्टाग्रामवर अर्जुनसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केली आहे. योगराज यांच्या कोचिंगमध्ये अर्जुन आता गोलंदाजीसोबत फलंदाजीच्या देखील युक्त्या शिकत आहे. तो देखील युवराज सिंगसारखा सिक्सर किंग होण्याच्या तयारीत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले अर्जुनचे फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहेत. अर्जुन क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घाम गाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तो चंडीगड मधील डीएव्ही कॉलेज येथील अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे. विशेष बाब म्हणजे योगराज यांनी युवराजला लहानपणापासूनच क्रिकेटचे प्रशिक्षण दिले होते.

64 वर्षीय योगराज सिंग यांनी 1980-81 मध्ये भारतीय संघासाठी 6 एकदिवसीय सामने आणि एक कसोटी खेळली होती. ते देखील गोलंदाज म्हणून संघाचा हिस्सा होते. खरं तर अत्रे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे क्रिकेट स्टेडियम-16, चंडीगड आणि टीडीएल क्रिकेट स्टेडियम, पंचकुला येथील सामने रद्द करण्यात आले.