२० वर्षांनी अगदी तसेच घडले; २००३-२०२३ World Cup Final मधील ६ दुर्दैवी योगायोग

१९ नोव्हेंबर २०२३ ही ती तारीख जेव्हा विश्वचषक फायनलमध्ये विजयाची नवी गाथा लिहिण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली. टीम रोहित ब्रिगेड कपिल देव आणि एमएस धोनीसारखे जगज्जेते होण्यापासून फक्त एक पाऊल दूर होते

पण यानंतर कांगारूंनी अशी बाजी पलटवली त्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कांगारूंनी भारताचा ६ विकेट्स राखून पराभव केला आणि ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले.

याप्रकारे टीम इंडियाची ऑस्ट्रेलियासोबत वर्ल्डकपमधील २० वर्ष जुना हिशोब चुकता करण्याची संधी हुकली. हे दुर्दैवी म्हणा किंवा योगायोग, परंतु २००३ मध्ये विश्वकप फायनलमध्ये टीम इंडियाला असाच पराभव हाती लागला होता.

२००३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा सलामी फलंदाज सचिन तेंडुलकर केवळ ४ रन्स बनवून आऊट झाले होते. सचिन ग्लेन मैक्गाच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात विकेट गमावून बसला. या विश्वकप फायनलमध्ये शुबमन गिलही ४ रन्स बनवून स्टार्कच्या चेंडूंवर झेलबाद झाला.

इतकेच नाही तर दुर्दैवी योगायोग म्हणजे दोन्ही विश्वकप फायनलमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या ओव्हरमध्ये १५-१५ रन्स दिलेत. २००३ मध्ये फायनल मॅचमध्ये झहीर खानने पहिल्या ओव्हरला १५ रन्स दिले तर हाच योग जसप्रित बुमराहच्या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला.

दोन्ही विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाचे ६ असे बॅट्समन होते ज्यांना त्यांची धावसंख्या दुहेरी आकड्यात बदलता आली नाही. २००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर (४), मोहम्मद कैफ (०), हरभजन सिंग (७), झहीर खान (४), जवागल श्रीनाथ (१) आणि आशिष नेहरा (नाबाद ८) यांच्यासह ६ फलंदाजांनी एकेरी धावा करत बाद झाले.

तर २०२३ च्या विश्वकप फायनलमध्येही शुबमन गिल ४, श्रेयस अय्यर ४, रवींद्र जडेजा ९, मोहम्मद शमी ६, जसप्रित बुमराह १ आणि मोहम्मद सिराज नाबाद ९ धावा करत पुन्हा पव्हेलियनला परतले.

दोन्ही विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा तिखट मारा पाहायला मिळाला. दोन्ही फायनलमध्ये कांगारू गोलंदाजांना समान विकेट्स मिळाल्या आहेत. २००३ मध्ये ग्लेन मैक्गा - ३, ब्रेट ली २, एँड्र्यू सायमंड्स- २, एंडी बिकल १, ब्रॅड हॉग १ तर २०२३ मध्ये मिचेल स्टार्क ३, जोश हेजलवुड -२, पॅट कमिंस २, एडम जैम्पा १, ग्लेन मैक्सवेल १ अशा विकेट्स गोलंदाजांनी घेतल्या.

२००३ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासाठी रिकी पाँटिंगने जे काम केले, तेच काम यावेळी ट्रॅव्हिस हेडने केले. जिथे रिकी पाँटिंगने ४ चौकार आणि ८ षटकार लगावत १४० धावा केल्या.तर ट्रॅव्हिस हेडने १५ चौकार आणि ४ षटकार मारत १३७ धावा स्कोअर बोर्डवर लावल्या.अर्थात दोघांच्या स्कोअरमध्ये ३ धावांचा फरक असला तरी दोघांचा स्ट्राईक रेट ११५ च्या आसपास होता.

दोन्ही विश्वकप फायनलमध्ये टीम इंडियाचे २-२ फलंदाजांनी ४ रन्सवर आऊट झाले. २००३ मध्ये जिथं सचिन तेंडुलकर आणि झहीर खान ४ रन्स बनवून परत गेले. तसेच या विश्वकपमध्ये शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या धावांवर बाद झाले.