कॅप्टन कूल धोनीचं देशप्रेम दिखाऊ नाही, पाहा हे PHOTO

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 31 जुलैपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून पहारा देणार आहे. 31 जुलै तो 15 ऑगस्ट या कालावधीत काश्मीर खोऱ्यात व्हिक्टर फोर्ससोबत पेट्रोलिंग करणार आहे. भारतीय सैन्यासाठी योगदान देता यावे यासाठी धोनीनं आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.

लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीच्या ग्लोव्हजवरील बलिदान चिन्हावर प्रचंड टीका झाली होती. त्यानं भारतीय सैन्याप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी ग्लोव्हजवर इंडियन पॅरा स्पेशल फोर्सच्या बलिदान चिन्ह लावले होते.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी धोनीनं घरच्या मैदानावर म्हणजेच रांची येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सामन्यात भारतीय खेळाडूंना सैन्याची कॅप भेट म्हणून दिली होती.

38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली. त्यानं आग्रा येथील ट्रेनिंग कॅम्पमध्ये आर्मी एअरक्राफ्टकडून पॅराशूट जम्पचे प्रशिक्षण घेतले आणि त्यात तो पासही झाला

2018साली पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी आर्मीच्या गणवेशात राष्ट्रपती भवनात दाखल झाला होता. सचिन तेंडुलकरनंतर या पुरस्काराने गौरवण्यात आलेला तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमध्येही धोनीच्या कॅपवर आणि फोन कव्हरवर बलिदान चिन्ह अनेकदा पाहायला मिळाले आहे.