आयपीएलमधून अजब कारणांसाठी बॅन केलेले पाच खेळाडू, कारण ऐकून व्हाल हैराण!

भारतीय युवा खेळाडूंसाठी आयपीएल स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ ठरतं. दरवर्षी या स्पर्धेतून आपल्याला नवनवे युवा खेळाडू मिळत असतात. स्पर्धेत जवळपास प्रत्येक सामन्यात काही मनोरंजक आणि थरारक गोष्टी देखील अनुभवयला मिळतात. आयपीएलमध्ये बंदीची कुऱ्हाड कोसळलेल्या अशाच काही खेळाडूंची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.

भारतीय युवा खेळाडूंमधील गुणांना वाव मिळावा आणि एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी लीग स्तरावर आयपीएल स्पर्धेचं आयोजन भारतात २००८ सालापासून करण्यात येऊ लागलं. आयपीएलमची आजवर एकूण १३ पर्व झाली आहेत. तर १४ वं पर्व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यावरच स्थगित करावं लागलं आहे.

आयपीएलमध्ये आजवर अनेक गमतीदार, थरारक आणि मनोरंजक किस्से पाहायला मिळाले आहेत. तसेच मोठ्या घडामोडी आणि वादविवाद देखील पाहायला मिळाले आहेत. आयपीएलला बेटिंगचंही ग्रहण लागलं होतं. त्यात काही खेळाडूंवर बंदीची कारवाई केली गेली

आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी खेळाडूंवर बंदीची कारवाई झाल्याचं आपण आजवर पाहिलं आहे. पण आयपीएलशी संबंधित असे ५ खेळाडू आहेत की ज्यांच्यावर एका वेगळ्याचं कारणासाठी बंदीची नामुष्की ओढावली होती.

ऑस्ट्रेलियाचा ल्यूक पोमर्सबॅच आयपीएलमध्ये २०१२ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. तर २००८ आणि २००९ साली त्यानं किंग्ज इंलेव्हन पंजाब संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या या डावखुऱ्या फलंदाजानं आयपीएलमध्ये १७ सामने खेळले असून ३०२ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. पण ल्यूक पोमर्सबॅचवर आयपीएलमध्ये बंदीची कारवाई करण्यात आली होती. २०१२ साली दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. एका महिलेसोबत गैरवर्तन आणि तिच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्याच्यावर कारवाई देखील झाली आणि जामिनावर सुटका करण्यात आली होती. या घटनेनंतर आयपीएलच्या प्रशासकीय मंडळानं त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ यानं आयपीएलच्या पहिल्याच पर्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पण दिल्ली आणि राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याच्या युरिन सॅम्पलमध्ये ड्रग्ज आढळल्यानं त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. पुढे मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंच्या समावेशावर बंदी घालण्यात आली.

रविंद्र जडेजा राजस्थान रॉयल्स संघाचा कॅप्टन आणि प्रशिक्षक असलेल्या शेन वॉर्नचा एक महत्वाचा शिलेदार होता. २००८ साली भारताच्या अंडर-१९ संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर जडेजाचं नाव चर्चेत आलं होतं आणि राजस्थान रॉयल्सनं त्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं होतं. दरम्यान, रविंद्र जडेजा राजस्थानच्या संघासोबत करारबद्ध झाल्यानंतरही इतर संघ व्यवस्थापनांसोबत कराराबाबत चर्चा करत असल्याची माहिती समोर आली होती. संघानं जडेजाच्या कृतीवर आक्षेप घेत कारवाई केली होती. जडेजाला २०१० सालच्या आयपीएलमध्ये बंदीला सामोरं जावं लागलं होतं. पण पुढच्याच वर्षी त्याचं कोची टस्कर्स केरला संघात पुनरागमन झालं होतं.

फिरकीपटू प्रवीण तांबे देखील राजस्थान रॉयल्स संघाचा महत्वाचा भाग राहिला आहे. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक देखील जमा आहे. नुकतंच केकेआर संघानं त्याच्यावर बोली लावून वयाच्या ४८ व्या वर्षात पाउल टाकलेल्या प्रवीण तांबेला संघात दाखल करुन घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात वयस्क खेळाडू ठरला आहे. पण २०२० साली बीसीसीआयनं प्रवीण तांबेवर एका अजब कारणासाठी बंदी घातली होती.

प्रवीण तांबेनं क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केल्यानंतर दुबईत झालेल्या टी-१० लीगमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्यानं आपली निवृत्ती मागे घेत मुंबई टी-२० लीगमध्येही सहभाग घेतला. पण याबाबत त्यानं बीसीसीआयला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे बीसीसीआयनं त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती.

आयपीएलमधील सर्वात वादग्रस्त प्रसंग म्हणून ओळखल्या गेलेल्या हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यातील वादाची घटना जगजाहीर आहे. आयपीएलच्या पहिल्याच ही घटना घडली होती. सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत होता आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून वेगवान गोलंदाज श्रीसंत प्रतिनिधित्व करत होता. सामन्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादात हरभजन सिंग यानं श्रीसंतच्या श्रीमुखात भडकावली होती. यासाठी हरभजन सिंगवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तर सीझन संपल्यानंतर मुंबईच्या संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना आपलं पद गमावावं लागलं होतं.

Read in English