Join us  

विजयाचा मार्ग शोधावा लागेल

आरसीबीसाठी २०१८ मध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरूला आमच्या गृहमैदानापेक्षा फार जास्त महत्त्व आहे. खरे बघता या मैदानाला अभेद्य गड बनवावा लागेल. मला हे स्थान अधिक पसंत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 4:30 AM

Open in App

- एबी डिव्हिलियर्स लिहितात...आरसीबीसाठी २०१८ मध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरूला आमच्या गृहमैदानापेक्षा फार जास्त महत्त्व आहे. खरे बघता या मैदानाला अभेद्य गड बनवावा लागेल. मला हे स्थान अधिक पसंत आहे. येथील माहोल, येथील इतिहास आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांचे मिळणारे समर्थन. येथील चाहत्यांचे आरसीबी संघावर जिवापाड प्रेम आहे. दुर्दैवाने गेल्या आयपीएलमध्ये पाहुण्या संघांनाही या स्थळाने झुकते माप दिले. त्यांच्यापैकी जास्तीत जास्त संघ येथे विजयी झाले. आम्हाला गृहमैदानावर सातपैकी केवळ एक सामना जिंकता आला. त्या वेळी आमची कामगिरी निराशाजनक झाली होती. पराभवासाठी कुठले कारण नाही.त्या वेळी खेळपट्टी संथ व अधिक उसळी न मिळणारी होती. हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन असल्याचे मानले जात असताना येथे १३०-१४० धावसंख्या विजयी स्कोअर मानल्या जात होता. आयपीएलच्या सर्व मोसमांमध्ये चिन्नास्वामीमध्ये प्रतिषटक ८.६१ च्या सरासरीने धावा फटकावल्या गेल्या आहेत. भारताच्या अन्य मैदानांच्या तुलनेत ही सरासरी अधिक आहे. पण, २०१७ मध्ये येथे केवळ ७.४२च्या सरासरीने धावा फटकावल्या गेल्या. फलंदाज या मैदानावर नैसर्गिक फटकेबाजी करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. याच मैदानावर एकेकाळी ख्रिस गेलने एकट्याने १७५ धावा फटकावल्या होत्या. आयपीएलमध्ये ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. याच मैदानावर आरसीबीने २६३ व २४८ चा स्कोअर केला आहे. आयपीएलच्या इतिहासात संघाचा हा सर्वोच्च स्कोअर आहे.चिन्नास्वामी खेळपट्टीचे यंदाच्या मोसमात कसे वर्तन राहील, याची मला सध्यातरी कल्पना नाही. बाह्यमैदान चांगले असून येथे जर वेगाने धावा फटकावल्या गेल्या तर आमच्यासाठी व चाहत्यांसाठी चांगली बाब ठरेल. परिस्थिती कशीही असली आणि खेळपट्टी कशीही असेल तरी त्यासोबत समरस होत विजयाचा मार्ग शोधावा लागेल.शुक्रवारी आम्हाला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आपल्या गृहमैदानावरील मोसमाची सुरुवात करायची आहे. पंजाब संघ मजबूत असल्याची कल्पना असून, आम्ही तयारी केली आहे. त्यासाठी आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजीमध्ये दिशा व टप्पा अचूक राखावा लागेल. चपळ क्षेत्ररक्षण करावे लागेल. त्यानंतर आम्हाला निश्चितच चिन्नास्वामीमध्ये चाहत्यांचा जल्लोष ऐकायला मिळेल. (टीसीएम)

टॅग्स :आयपीएल 2018