नवी दिल्ली: पुरुषांंप्रमाणे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात महिला खेळाडूंची कामगिरी किती लक्षवेधी असते याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात आला.
आता ‘आॅन फिल्ड अंपायर’ म्हणूनही महिला मैदानात उतरणार आहेत. आगामी रविवारी न्यू साऊथ वेल्स आणि आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पुरुष क्रिकेट सामन्यात कॅरी पोलोस्का पंच म्हणून मैदानात उतरणार आहेत. क्रिकेट मैदानात पंचाची कामगिरी करणारी ती पहिली महिला असेल. या सामन्यापूर्वी कॅरी म्हणाल्या,‘ मी एकदाही क्रिकेट खेळलेले नाही. मात्र क्रिकेटविषयी मला चांगली माहिती आहे. पंचांसाठी असलेल्या पात्रता परीक्षेत मला अनेकदा अपयश आले. मात्र मी प्रयत्न सोडले नव्हते.’
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी पहिल्यांदाच महिला पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने महिलांच्या आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरीतील सामन्यांसाठी चार महिला पंचाच्या नावाची घोषणा केली. त्यात कॅरी पोलोस्कासह न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू कॅथलिन क्र ॉस, इंग्लंडची रेडफर्ड आणि वेस्ट इंडिजची जॅकलिन विलियम्स यांचा समावेश आहे.
महिला विश्वचषकाच्या पात्रता फेरीत बांगलादेश, चीन, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलंड, थायलंड व झिम्बाब्वे या देशांचे संघ मैदानात उतरणार आहेत. यातील अव्वल दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. पात्रता फेरीतील सामने २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान थायलंडमध्ये रंगणार आहेत. या सामन्यांसाठी चार महिला पंचांची आयसीसीने नियुक्ती केली.