जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने जूनमध्ये इंग्लिश काउंटी टीम हॅम्पशरकडून पुनरागमन करण्याचा निर्धार केला आहे. ३४ वर्षांचा डेल स्टेन गेल्या दोन वर्षांपासून दुखापतींनी त्रस्त आहे. या काळात तो क्रिकेटपासून बराच लांब राहिला. जानेवारीत भारताविरोधातील कसोटी सामन्यात त्याला टाचेला दुखापत झाली होती. मात्र आता तो लवकरच तंदुरुस्त होईल. स्टेन म्हणाला की,‘मी १२ ते १५ षटके टाकू शकतो. मात्र एका कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी बनण्यासाठी हे पुरेसे नाही. दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन करण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल.’
स्टेन दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक कसोटी बळी बाद करण्याच्या विक्रमापासून फक्त दोन गड्यांनी दूर आहे. शॉन पोलॉक याने आफ्रिकेकडून सर्वाधिक ४२१ बळी मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या श्रीलंका दौऱ्यात स्टेनला ही संधी मिळू शकते. तो म्हणाला की, ‘मला अजून एक महिना आराम करावा लागेल. मी आयपीएल खेळणार नाही. माझे लक्ष्य जूनमध्ये हॅम्पशरकडून खेळण्यावर आहे. त्यानंतर श्रीलंका दौºयात पुनरागमन करण्यावर माझा भर आहे.’ (वृत्तसंस्था)