Join us  

चुकांची पुनरावृत्ती कधी टाळणार?

ओव्हल कसोटीची सांगता अ‍ॅलिस्टर कूकच्या वैभवशाली कारकिर्दीमधील परिकथेसारख्या दमदार खेळीने झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 4:17 AM

Open in App

- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितातओव्हल कसोटीची सांगता अ‍ॅलिस्टर कूकच्या वैभवशाली कारकिर्दीमधील परिकथेसारख्या दमदार खेळीने झाली. एखाद्या खेळाडूसाठी उच्चशिखर गाठून खेळाला अलविदा करण्यासारखा मोठा आनंद नाही. त्यामुळेच इंग्लंडला अखेरच्या कसोटीत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या कूकला चाहत्यांनी दिलेली मानवंदना पाहण्यासारखी होती.दोन्ही संघातील खेळाडूंचा तुलनात्मक अभ्यास केल्यास मालिकेचा निकाल इंग्लंडच्या बाजूने ४-१ असा जायला नको होता. पण कसोटी क्रिकेटमध्ये तसूभरही चेंडूवरुन लक्ष भरकटणे परवडणारे नसते, हेच यानिमित्ताने सिद्ध झाले. भारताला देखील संधी होती, पण ट्रेंटब्रिजचा अपवाद वगळता आपल्या खेळाडूंना लाभ घेता आला नाही. त्याउलट इंग्लंडने संधी मिळताच भारतावर वर्चस्व गाजविण्याची संधी गमावली नाही. उदाहरणार्थ ट्रेंटब्रिजच्या पराभवानंतर साऊथम्पटन कसोटीत यजमान संघाने जी मुसंडी मारली, त्यावरुन तरी भारताने बोध घ्यायला हवा होता.पराभवाची कारणमीमांसा करताना भारतीय संघ व्यवस्थापन चुकांची पुनरावृत्ती कशी टाळावी यावर तोडगा शोधेल अशी आशा आहे. आघाडीची फळी लवकर गुंडाळल्यानंतरही प्रतिस्पर्धी फळीला लवकर बाद करण्यात आलेले अपयश दौºयात सर्वांत मोठी डोकेदुखी ठरली. या बाबीवरही तोडगा काढणे अनिवार्य असेल. ओव्हलवर विजयाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांच्या फटकेबाजीवर मी फारच प्रभावित झालो. विजयाची कुठलीही शक्यता दिसत नसताना या दोघांनी मनसोक्त फटकेबाजी करीत आशा पल्लवित केली. दोघांनीही शतके ठोकली. त्याआधी राहुलसाठी ही मालिका निराशादायी ठरली होती. रिषभचा खेळ पाहिल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये युवा खेळाडू सकारात्मक बदल घडवू शकतात, याची शक्यता वाटत आहे.राहुल बाद होताच भारत सामना वाचविण्यासाठी खेळताना दिसला. पण पंत खेळपट्टीवर असेपर्यंत निकाल भारताच्या बाजूने येईल, अशी शक्यता जाणवत होती. २०१४ मध्ये अ‍ॅडिलेड कसोटीत विराटने पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करीत विजय खेचून आणला होता. निकाल काय लागेल यापेक्षा लढवय्या वृत्ती दाखविणे महत्त्वपूर्ण असते. एकूणच भारतीय खेळाडूंनी लढवय्येपणा कायम राखून इंग्लंड दौºयातील चुकांपासून बोध घेतल्यास आॅस्ट्रेलिया दौºयात याचा लाभ नक्कीच होईल, यात शंका नाही.