ग्रेट कोण? सचिन तेंडुलकर की विराट कोहली...

एकंदरीत सचिन हा ग्रेट आहेच आणि राहील. पण विराटही आता सचिनच्या पंक्तीत बसण्याइतपत उंचीवर पोहोचलाय हेही मान्य करावे लागेल.

By बाळकृष्ण परब | Published: October 24, 2018 05:36 PM2018-10-24T17:36:56+5:302018-10-24T17:37:48+5:30

whatsapp join usJoin us
who is Great? Virat Kohli or Sachin Tendulkar ... | ग्रेट कोण? सचिन तेंडुलकर की विराट कोहली...

ग्रेट कोण? सचिन तेंडुलकर की विराट कोहली...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देधावांचा पाठलाग करण्यातही कोहलीचा हात कुणी धरू शकणार नाही, अगदी सचिनही नाही.

या जगात काही वाद, तुलना ह्या वर्षांनुवर्षे पिढ्यानपिढ्या चालू आहेत. त्यावरून चर्चा, वादविवाद झडत आहेत. असाच एक वाद म्हणजे क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण याची होणारी तुलना. आज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगाने दहा हजार धावा पूर्ण करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आणि या तुलनेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. खरंतर ही तुलना फार पूर्वीपासूनच सुरू आहे. पण गेल्या काही काळात विराटच्या बँटमधून विक्रमांचा ओघ वाढल्यापासून या चर्चेला अधिक बळ मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजीचे बहुतांश विक्रम गाठीशी बांधून सचिनने निवृत्ती स्वीकारल्यावर त्याचे विक्रम मोडणे तर दूर त्याच्या आसपासही पोहोचणे कुणाला शक्य होणार, असे भाकीत क्रिकेट पंडितांनी वर्तवले होते. सचिन गेल्यापासून आम्ही क्रिकेट पाहायचे कमी केले, असे सांगणारेही अनेकजण भेटायचे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावरून सचिनचा अस्त होत असतानाच विराट कोहलीचा उदय झाला. कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच आपल्या फलंदाजीचा वरचा क्लास दाखवणाऱ्या विराटचा खास असा चाहतावर्ग निर्माण झालाय. 

खरंतर सचिन आणि विराट यांच्या खेळाची थेट तुलना करणे, हा या दोन्ही फलंदाजांवरील अन्याय ठरेल. कारण सचिन ज्या काळात खेळला आणि विराट कोहली ज्या काळात खेळतोय, त्यादरम्यान क्रिकेट मोठ्या प्रमाणात बदलले आहे. सचिनच्या काळातील संघ, गोलंदाज, मैदाने आणि आताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. पण शेवटी दोन विक्रमवीरांमध्ये तुलना ही होणारच. 

सचिनला आपल्या कारकीर्दीतील बहुतांश काळ जगातील सर्वोत्तम अशा गोलंदाजांचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मँकग्रा, मायकेल कँप्स्प्रोविच, गिलेस्पी, शेन वॉर्न. तिकडे दक्षिण आफ्रिकेत अँलन डोनाल्ड, शॉन पोलॉक. पाकिस्तानचे वासिम अक्रम, वकार युनुस. श्रीलंकेचे चामिंडा वास, मुरलीधरन अशा गोलंदाजांचा सातत्याने सामना करावा लागला. तर विराटला सचिनप्रमाणे खुंखार गोलंदाजांचा फारसा सामना करावा लागलेला नाही. ग्लेन मँकग्रा, अँलन डोनाल्ड, शॉन पोलॉक, वासिम अक्रम यासारख्या गोलंदाजांसमोर त्याची परीक्षा झालेली नाही. 

 त्याकाळात भारतीय संघाच्या तुलनेत इतर संघ हे तगडे होते. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यांच्याविरुद्ध सामना म्हटला की मैदानात उतरण्याआधीच प्रतिस्पर्धी मानसिक दबावामुळे बेजार होत असत. पण आज ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका अशा तगड्या संघांची क्रिकेटच्या मैदानातील दादागिरी जवळपास संपुष्टात आलीय. त्यांचा पूर्वीसारखा दबदबा राहिलेला नाही.

 त्यात सचिन आला तेव्हा भारतीय संघाची फलंदाजी हा एकखांबी तंबू होता. सचिन गेला की सारं संपायचं. अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजीचा डोलारा सावरण्याची कामगिरी सचिनला पार पाडावी लागे. पण भारतीय क्रिकेट संघ आता पूर्वीसारखा एका फलंदाजावर अवलंबून राहिलेला नाही. आजही विराटला भारतीय फलंदाजीची सूत्रे आपल्याकडे ठेवावी लागतात, पण सचिनएवढा दबाव विराटला झेलावा लागत नाही.

 सचिनची फलंदाजीची शैली, तंत्र आणि त्याच्या फटक्यांमधील सौंदर्य लाजवाब होते. म्हणूनच त्याने दुबईत केलेली ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कत्तल, 2003 च्या विश्वचषकात अँडी कँडिक आणि शोएब अख्तरला मारलेले षटकार क्रिकेटप्रेमींच्या नजरेसमोर आहेत. तर विराटच्या खेळात नजाकतीपेक्षा पॉवर हिटिंगच अधिक आहे. पण प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यात तो सचिनएवढाच वाकबगार आहे.

विराटला आपल्या कारकीर्दीत सचिनप्रमाणे खडतर आव्हानांचा सामना करावा लागलेला नाही. पण असे असले तरी विराट काही बाबतीत नक्कीच सरस आहे. त्याच्या खेळातील सातत्य, दबाव न घेता फलंदाजी करण्याची हातोटी सध्या अन्य कुठल्याही फलंदाजाकडे नाही. तसेच धावांचा पाठलाग करण्यातही त्याचा हात कुणी धरू शकणार नाही, अगदी सचिनही नाही. उल्लेखनीय म्हणजे तीनशेहून अधिक धावांचे आव्हान समोर असताना विराटचा खेळ अधिक बहरतो. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे त्याने श्रीलंकेविरुद्ध केलेली वादळी खेळी. 2013 मध्ये जयपूर वनडेत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची केलेली कत्तल. गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यावर केदार जाधवसोबत केलेली मँचविनिंग खेळी, अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. 

एकंदरीत सचिन हा ग्रेट आहेच आणि राहील. पण विराटही आता सचिनच्या पंक्तीत बसण्याइतपत उंचीवर पोहोचलाय हेही मान्य करावे लागेल. बाकी तो सचिनचे किती विक्रम मोडेल आणि कधी मोडेल याचे उत्तर येणारा काळच देईल.

Web Title: who is Great? Virat Kohli or Sachin Tendulkar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.