Join us  

धोनीच्या 300 वन-डे सामन्यापैकी 'ते' दोन वेगळे सामने कोणते?

महेंद्रसिंग धोनीचे 300 वन-डे सामने आणि त्यात तो सर्वाधिक 73 वेळा नाबाद राहण्याची भरपूर चर्चा झाली परंतु धोनीच्या या 300 सामन्यांपैकी दोनच सामने असे आहेत जे पाठलाग करताना धोनी नाबाद राहिला पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 3:55 PM

Open in App

- ललित झांबरेनवी दिल्ली, दि. 2 - महेंद्रसिंग धोनीचे 300 वन-डे सामने आणि त्यात तो सर्वाधिक 73 वेळा नाबाद राहण्याची भरपूर चर्चा झाली परंतु धोनीच्या या 300 सामन्यांपैकी दोनच सामने असे आहेत जे पाठलाग करताना धोनी नाबाद राहिला पण भारतीय संघ जिंकू शकला नाही. यापैकी एक आपण हरलो तर दुसरा 'टाय' सुटला. 

या अपवादात्मक दोन सामन्यांपैकी आपण गमावलेला एकमेव सामना होता तो 3 जानेवारी 2013 चा. कोलकाता येथील त्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 85 धावांनी मात दिली होती. यात त्यांनी भारताला विजयासाठी 251 धावांचे आव्हान दिले होते मात्र आपला डाव 48 षट्कात 165 धावांमध्ये आटोपला होता. आणि यावेळी धोनी नाबाद राहिला होता 54 धावांवर. 

दुसरा सामना जो आपण जिंकू शकलो नाही पण हरलोसुध्दा नाही म्हणजे बरोबरीत (टाय) सोडवला तो म्हणजे 14 फेब्रुवारी 2012 रोजीचा  अॅडिलेड येथील श्रीलंकेविरुध्दचा सामना. हा सामना अगदी परफेक्ट टाय होता कारण यात दोन्ही संघ, भारत आणि श्रीलंकेचा स्कोअर अगदी सारखाच 9 बाद 236 असा होता आणि यात धोनी शेवटी 58 धावांवर नाबाद परतला.

यात अगदी शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी चौकाराची गरज होती त्यावेळी धोनीने चेंडू एक्स्ट्रा कव्हरवरुन फटकावला खरा पण सेनानायके व कुलशेखरा यांनी धोनीचा प्रयत्न हाणून पाडला आणि धोनीला केवळ तीनच धावा मिळाल्याने तो सामना नाट्यमयरित्या बरोबरीत सुटला होता. हे दोन अपवाद सोडले तर भारत धावांचा पाठलाग करतोय आणि धोनी नाबाद आहे असा एकही सामना त्याच्या 300 सामन्यांमध्ये आपण गमावलेला नाही. उलट अशा 75 सामन्यांपैकी 40 सामने आपण जिंकलेत, एकच हरलो, एक टाय सुटला आणि 3 सामने पूर्ण खेळलेच गेले नाहीत. उर्वरीत 30 सामन्यात धोनीला फलंदाजीसाठी उतरण्याची गरजच पडली नाही. धोनीच्या नाबाद राहण्याच्या विक्रमातील ही माहिती फारच थोड्या लोकांना माहिती आहे.

टॅग्स :एम. एस. धोनी