तिरुवनंतपुरम : ‘एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये आमचा संघ चांगला खेळला. परंतु, निर्णायक सामन्यात आम्हाला लय कायम राखण्यात अपयश आले,’ अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याने दिली.
निर्णायक टी-२० सामन्यात भारताविरुद्ध निसटत्या पराभवासह मालिका गमावावी लागल्यानंतर विल्यम्सनने म्हटले, ‘दोन्ही मालिकेतील निर्णायक सामन्यात आम्ही चांगले खेळलो पण विजयी होऊ शकलो नाही. दोन्ही सामने अखेरच्या काही चेंडूपर्यंत खेचले गेले आणि आम्हाला निसटती हार पत्करावी लागली. एक संघ म्हणून आम्ही चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहोत. अजून आम्हाला लांबचा पल्ला गाठायचा आहे पण आम्हाला सकारात्मक संकेत मिळत आहेत.’
मालिकेबाबत विल्यम्सनने सांगितले, ‘ही एक शानदार मालिका ठरली आणि दोन्ही संघांनी चमकदार खेळ केला. अनेक सामने अखेरच्या काही चेंडूंपर्यंत रंगले. याचा अनुभव घेणे खूप चांगले वाटले पण पराभूत होणे निराशाजनक होते. कॉलिन मुन्रोने मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. गोलंदाजांनी विशेषकरुन फिरकी गोलंदाजांनी आपली छाप पाडली.’