कोलकाता : क्रिकेटच्या सर्व प्रकारात आमचा संघ फलंदाजीत अपयशी का ठरतो हे एक कोडेच आहे. मोठ्या चुका होत असून यावर तोडगा शोधण्यात अद्याप यश आले नसल्याची कबुली आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दिली.
भारताविरुद्ध दुस-या एकदिवसीय सामन्यात सात फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरल्याने हा सामना आॅस्ट्रेलियाने ५० धावांनी गमावला. २५३ धावांचे लक्ष्य गाठताना पाहुणा संघ ४३.१ षटकांत २०२ धावांत गारद झाला होता. सामना संपल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत स्मिथ म्हणाला, ‘आमच्याकडून वारंवार चुका होत आहेत. यावर कायम तोडगा शोधणे गरजेचे आहे. खेळातील खराब तंत्र किंवा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे चुका होत आहेत का, असे विचारताच स्मिथने उत्तर देण्याचे टाळले. ‘आम्हाला दडपणातही चांगला खेळ करावा लागेल. त्यासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतील,’ इतकेच त्याने सांगितले.
दौºयाची तयारी तर सुरेख झाली. मैदानावर डावपेच अमलात आणायचे आहेत. मोठी भागीदारी करण्यासाठी यापुढे फाजील चुका टाळाव्या लागतील. भारतासारख्या संघाविरुद्ध अशा चुका करणे महागडे ठरते. केवळ फलंदाजीच नव्हे तर मैदानात प्रत्येक आघाडीवर सरस कामगिरी करणे गरजेचे असल्याचे स्मिथने स्पष्ट केले.
एकत्र बसून चर्चा केल्याने काही होणार नसल्याचे सांगून तो म्हणाला, ‘मैदानावर प्रत्यक्ष डावपेच अमलात आणावे लागतील. सध्या सर्व डावपेच फसवे ठरत आहेत.’ खेळाडू घाबरले आहेत का, असे विचारताच स्मिथने नकार दिला. तो म्हणाला, ‘असे काहीही नाही. मागच्या सामन्यात थोेडे दडपण होते. माझे सहकारी सावध भूमिका बाळगण्याच्या प्रयत्नांत ‘बेसिक्स’ विसरल्याचे निदर्शनास येत आहे.’ (वृत्तसंस्था)